उदयनराजेंच्या आघाडीत सर्वपक्षीयांची उपस्थिती
By admin | Published: December 28, 2016 12:45 AM2016-12-28T00:45:59+5:302016-12-28T00:45:59+5:30
‘राजधानी सातारा’ची अधिकृत घोषणा : प्रस्थापित राजकारण्यांनी लोकांना बाद केल्याचा आरोप
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी विविध पक्षांतील नाराज पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मंगळवारी राजधानी सातारा विकास आघाडीची घोषणा केली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक या आघाडीच्या माध्यमातूनच लढली जाईल, असे सूतोवाच त्यांनी केले. तसेच प्रत्येक तालुक्यातून धडाडीचे व तळमळीचे उमेदवार निवडण्याची सूचनाही
केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्मितीला ५५ वर्षे उलटून गेली तरी शेतकऱ्यांचे व कष्टकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत. राजकारणी मंडळी लोकांच्या मतांच्या बळावर निवडून येतात आणि नंतर त्यांना विसरून जातात. सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात व्यक्तीकेंद्रित राजकारणाचा उदोउदो सुरू आहे. आपण कुठल्याही पदाला फारशी किंमत दिली नाही. प्रस्थापित मंडळी मलाही त्यांच्यातीलच समजत होते; त्यांच्यासोबत राहून मला खूप काही साध्य करता आले असते. पण मला ते करायचे नव्हते. वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या शेतकरी व कष्टकऱ्यांना प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी राजधानी सातारा विकास आघाडीचा विचार आपण सर्वांपुढे मांडत आहोत, असे उदयनराजेंनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या अनेकांना बाजूला काढण्याचे पाप राजकारणी मंडळी करत आहेत, असा आरोप करून उदयनराजे म्हणाले, ‘अलीकडे शिफारशीशिवाय उमेदवारी मिळत नाही. मी आणि माझे कुटुंब यापलीकडे राजकारणी जायला तयार नाहीत.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी प्रास्ताविक तर जिल्हा काँगे्रसचे सरचिटणीस सुनील काटकर यांनी स्वागत केले. बैठकीला कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, साताऱ्याच्या नगराध्यक्षा माधवी कदम, सदाशिव सपकाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय भगत, शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकर गोडसे, शंकर शिंदे, राहुल कदम, युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष अॅड. श्रीकांत चव्हाण, धर्माप्पा जगदाळे, वाईचे माजी सभापती विजयराव नायकवडी, प्रल्हाद चव्हाण, सयाजीराव शिंदे (जावली), भिकू भोसले, यशवंत ढाणे, जिल्हा परिषद सदस्य समृद्धी जाधव, संदीप शिंदे, प्रल्हादराव चव्हाण, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन मोहिते, विवेक भोसले, सातारा तालुका काँगे्रस कमिटीचे
अध्यक्ष नंदाभाऊ जाधव, राहुल पाटील, पैलवान बंडा जाधव, बाळासाहेब कदम, विकास जाधव, अर्जुनराव साळुंखे, समीर जाधव, हैबतबापू नलावडे, गुरुदेव बरदाडे, अजयराव धायगुडे, हणमंत चवरे, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
बच्चा समझ के छोड दिया...
तुमच्या लॉलिपॉपला मी भीक घालत नाही. कुठलाही लॉलिपॉप मला गप्प ठेवणार नाही. त्यांच्यावर टीका न करता ‘बच्चा समझ के छोड दिया,’ अशा शब्दात उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली.