विजांच्या गडगडाटात जोरदार पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:38 AM2021-05-16T04:38:32+5:302021-05-16T04:38:32+5:30
आडचाली ऊस, पालेभाज्यासह उन्हाळी भुईमुगाचे पिक धोक्यात पेरणी पूर्व मशागतीला पोषक लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : मलकापूरसह परिसरात शनिवारी ...
आडचाली ऊस, पालेभाज्यासह उन्हाळी भुईमुगाचे पिक धोक्यात
पेरणी पूर्व मशागतीला पोषक
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : मलकापूरसह परिसरात शनिवारी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडाकडाटात जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या जोराच्या पावसामुळे वेलवर्गीय भाजीपाला पिकांसह आडसाली ऊस, उन्हाळी भुईमुगाचे पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे, तर शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीला पोषक वातावरण होणार आहे.
परिसरात दोन दिवसांपासूनच उकाड्यात वाढ व ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. शनिवारी दुपारी बारापासूनच आकाशात ढग जमा होण्यास सुरुवात झाली होती. दुपारनंतर सव्वाचारच्या सुमारास सगळीकडे ढग दाटून आले. त्यामुळे दिवसा मावळल्यासारखे वातावरण झाले होते. अचानक विजांचा कडकडाटास सुरुवात झाली. काही क्षणांतच वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. साडेसहा वाजेपर्यंत सुमारे दोन तास पडलेल्या पावसामुळे मलकापुरातील कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. उपमार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे दोन्ही बाजूचे उपमार्ग जलमय झाले होते. जोरदार पावसामुळे उकाड्यापासून थोडा गारवा मिळाला. मात्र आज झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे.
मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. सध्या पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टमाटा, दुधी भोपळा, काकडी, कारले ही वेलवर्गीय पिकेही घेतली जातात. भेंडी, गवारी, गेवडा यांसारख्या शेंगवर्गीय भाज्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही सध्या या परिसरात वाढली आहे. पावसामुळे पालेभाज्याच्या रानात पाणी साचल्याने या पिकांचे नुकसान झाले, तर जोराच्या वाऱ्याने वेलवर्गीय पिकांचे मांडव भुईसपाट झाले. अनेक ठिकाणी आडसाली ऊस भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. अचानक आलेल्या दमदार पावसामुळे सध्या काढणीयोग्य असलेले भुईमुगाचे पीक धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र पावसाने पेरणीपूर्व मशागतीसाठी चांगले वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
===Photopath===
150521\img_20210515_184230.jpg
===Caption===
मलकापूरसह परिसरात जोरदार पावसाची हजेरी (छाया-माणिक डोंगरे)