आला रे आला मान्सून आला, सातारा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
By दीपक देशमुख | Published: June 24, 2023 04:04 PM2023-06-24T16:04:36+5:302023-06-24T16:22:07+5:30
महाविद्यालयीन विद्यार्थी, प्रवासी नागरिकांनी पावसाचा आनंद लुटला
सातारा : जून महिना सुरू झाल्यापासून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या सातारकरांना अखेर दिलासा मिळाला असून शनिवारी दुपारी दमदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात अखेर मान्सून सक्रिय झाला आहे. ढगाळ वातवरण आणि दमदार पावसामुळे सातारकर आनंदले आहेत.
जून महिना संपत आला तरी मान्सून बरसत नसल्याने सातारकर तसेच जिल्हावासिय चिंतेमध्ये होते. जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठल्यामुळे जिल्हावासिय पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत होते. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि हलकेसे भुरंगट पडत होते. परंतु दमदार पाऊस होत नव्हता. अखेर आज शनिवार दुपारी पावसाने दमदार हजेरी लावली.
शहरातील सदर बाजार, पोवई नाका, राजवाडा, महामार्ग परिसरात जोरदार सरी कोसळल्या. तसेच जिल्ह्याच्या अनेक भागात देखील पावसाने हजेरी लावली. पावसामुळे सातारा शहरातील रसतांवर पाणी साचले. महाविद्यालयीन विद्यार्थी, प्रवासी नागरिकांनी पावसाचा आनंद लुटला.