विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:48 AM2021-02-20T05:48:24+5:302021-02-20T05:48:24+5:30
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी उत्तर भागात गुरुवारी अचानक विजाच्या कडकडाटांसह आलेल्या पावसाने रब्बी ज्वारी, हरभरा, गहू ...
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी उत्तर भागात गुरुवारी अचानक विजाच्या कडकडाटांसह आलेल्या पावसाने रब्बी ज्वारी, हरभरा, गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. ऊसतोडणी हंगामही लांबणीवर जाण्याची भीती ऊस उत्पादक व्यक्त करत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून हवेत वाढलेल्या उष्णतेमुळे पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती. गुरुवारी सायंकाळी साडेचार ते सहा यावेळेत कोरेगाव तालुक्यातील देऊर, अंबवडे, पिंपोडे, नांदवळ, सोनके, सोळशी, रणदूलाबाद या गावाला या मुसळधार पावसाने धोपटून काढले. यामुळे रब्बी हंगामातील ऐन सुगीत आलेली ज्वारी, गहू, हरभरा या पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी काढून पडलेली ज्वारी पाण्यात भिजल्यामुळे ज्वारीच्या पिकाचे मोठं नुकसान झालं आहे. या शिवाय मोहरात आलेल्या आंब्याचा मोहर गळून पडला आहे. या भागातील द्राक्ष पिकालाही फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे या भागातील ज्वारी, हरभरा, गहू, पिकांची तत्काळ पाहानी करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याशिवाय वेगात सुरू असलेल्या ऊस गाळप हंगामाला ही पावसामुळे ब्रेक लागला आहे.