जिल्ह्याच्या दुष्काळी भागात पावसाची दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 02:03 PM2019-09-25T14:03:44+5:302019-09-25T14:05:22+5:30
सातारा : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्रीच्या सुमारास पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. विशेष म्हणजे माण आणि फलटण तालुक्यातही ...
सातारा : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्रीच्या सुमारास पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. विशेष म्हणजे माण आणि फलटण तालुक्यातही दमदार पाऊस बरसला. त्यामुळे गावोगावचे तलाव, बंधारे भरत असून ओढेही वाहत आहेत. यामुळे बळीराजांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत पाऊस झाला. त्यामुळे वेळेपूर्वी सर्व प्रमुख धरणे भरली. त्या तुलनेत सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्व भागात पावसाने हुलकावणी दिलेली. पण, आता पूर्व दुष्काळी भागात चांगला पाऊस होत आहे.
सोमवारी माण, खटाव आणि फलटण तालुक्यात जोरदार पाऊस झालेला. त्यामुळे फलटणमधील बाणगंगा आणि माण तालुक्यातील माणगंगा नदी वाहू लागलेली. या पावसामुळे अनेक तलाव भरुन वाहू लागलेले. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण असतानाच मंगळवारी रात्रीनंतर फलटण आणि माण तालुक्याला झोडपून काढले.
मंगळवारी रात्रीचा पाऊस माण तालुक्यात सर्वदूर झाला. दहिवडी, मलवडी, सत्रेवाडी, कुकुडवाड, म्हसवड, भाटकी, वरकुटे मलवडी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. तर विरळी खोºयात पाऊस झाल्याने महाबळेश्वरवाडी तलावात चांगला पाणीसाठा झाला.
वॉटर कप स्पर्धेचा फायदा...
गेल्या तीन वर्षांत माण तालुक्यामध्ये वॉटर कप स्पर्धेचे मोठे काम झाले आहे. गाव शिवार, माळरानावर जलसंधारणाची कामे झाली आहेत. त्यातच आता दोन वर्षांनंतर चांगला पाऊस बरसत असल्याने डीपसीसीटी, नालाबांध, बंधाºयात पाणी साठले आहे. याचा शेतीसाठी फायदा होणार आहे.