अध्यक्षपद द्या.. खासदारकी लढवतो!
By admin | Published: March 20, 2017 11:39 PM2017-03-20T23:39:15+5:302017-03-20T23:39:15+5:30
मानकुमरेंची जाहीर मागणी : राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सदस्यांना पक्षनिष्ठेचे धडे
सातारा : ‘जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिल्यास विद्यमान खासदारांविरोधात पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणूकही लढवेन,’ अशी इच्छा वसंतराव मानकुमरे यांनी सोमवारी पक्षाच्या नेत्यांकडे जाहीरपणे बोलून दाखविली. मोठ्या संघर्षातून जावळी पंचायत समितीच्या सहाच्या सहा जागा निवडून आणल्या आहेत, त्यामुळे पक्षाने संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केली.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीत प्रत्येक तालुक्यातील नवनियुक्त सदस्यांशी विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार नरेंद्र पाटील आदींनी संवाद साधला.
अध्यक्षपदासाठी वसंतराव मानकुमरे हे देखील इच्छुक आहेत. आपल्या समर्थकांसह त्यांनी नेत्यांची भेट घेऊन आपल्याला अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी केली. जावळी तालुक्यातील पंचायत समितीच्या सर्वच जागा राष्ट्रवादीला मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. तसेच
जावळी तालुक्याला अध्यक्षपदापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे संधी द्यावी, अशी त्यांची मागणी होती. ‘पक्षाने संधी दिल्यास खासदारकी लढवाल का?,’ अशी विचारणा नेत्यांनी केल्यानंतर ‘हो पक्षासाठी काहीही करायला तयार आहे,’ असे सांगत ‘मला अध्यक्षपद द्या, पक्षाने संधी दिल्यास खासदारकीही लढवेन,’ असे स्पष्टीकरण मानकुमरेंनी केले.
दरम्यान, याआधी नवनियुक्त सदस्यांना रामराजे, आमदार शशिकांत शिंदे, विक्रमसिंह पाटणकर
आदींनी मार्गदर्शन केले. रामराजे म्हणाले, ‘मागील काळात पक्षाने अनेकांना चांगल्या पदावर संधी दिली. मात्र, त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या. गेल्या अडीच वर्षांत तर त्याचा कहरच झाला. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी विरोधी गटाकडून अर्ज भरला जाऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी पक्षाच्या भूमिकेशी ठाम राहायचे आहे. ज्यांना आता संधी मिळणार नाही, त्यांचा टप्प्याटप्प्याने विचार केला जाईल.’
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने मागच्या निवडणुकीपेक्षा मोठे यश मिळविले. ४० जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. आता
पक्षाची चौकट मोडून कोणीही
विचार करायचा नाही. जे पक्षाविरोधात बोलतात त्यांचा आक्रमकपणे प्रतिकार करायला हवा. सर्वांनी एकजुटीने राहायचे आहे.’ (प्रतिनिधी)
रामराजेंनी बाळासाहेबांना थांबवले
जिल्हा परिषदेत उंडाळकरांच्या कऱ्हाड विकास आघाडीला सोबत घेणार का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आम्हाला त्यांची गरज नाही, असे उत्तर आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिले. त्यावर रामराजेंनी त्यांना थांबवत शिंदेंना उत्तर देण्याबाबत सूचना केली. ‘समविचारी विचाराच्या लोकांनी आम्ही नक्की सोबत घेऊ,’ असे उत्तर आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले.
दगड टाकणारे सर्वच मागणी करतील
खासदारांच्या गाडीवर आम्ही दगड टाकले, असे वसंत मानकुमरे यांच्यासोबत आलेल्या एकाने सांगितले, त्यावर आमदार मकरंद पाटील यांनी ‘कोणीही उठेल, अन् दगड मारत बसेल, ती काय पदे मिळविण्याची गुणवत्ता आहे का?,’ असे विचारले.
वाई मतदार संघात एक पद निश्चित
‘वाई मतदार संघात राष्ट्रवादीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये यश मिळविले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपद वाई मतदार संघाला मिळणार नाही, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे सभापतिपदासाठी आमदार मकरंद पाटील आग्रही आहेत. वाई, खंडाळा, महाबळेश्वर या मतदार संघात निश्चितपणे सभापतिपद मिळेल,’ असे स्पष्टीकरण आमदार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
रामराजेंचे उदयनराजेंवर शरसंधान
‘राष्ट्रवादीच्या माध्यमातू पदे मिळविणाऱ्यांचे खासदार उदयनराजे भोसले यांनी समर्थन केले. आता तेच त्यांनी निवडून आणलेल्या सदस्यांची पक्षाकडे शिफारस करत आहेत,’ अशी टीका रामराजेंनी उदयनराजेंवर केली.