लोकशाही आघाडीचा अध्यक्ष ‘हिटलर’!
By admin | Published: February 26, 2015 10:31 PM2015-02-26T22:31:51+5:302015-02-27T00:16:47+5:30
जनशक्ती आघाडीचा घणाघात : सभागृहाच्या ‘त्या’ नावाला विरोध
कऱ्हाड : ‘कऱ्हाड पालिकेचा कारभार एका व्यक्तीच्या हुकूमावरती चालत आहे. सत्ताधारी आघाडीच्या नावात लोकशाही असली तरी पालिकेत सध्या फक्त हुकूमशाहीच सुरू आहे. आणि ती हुकूमशाही राबवणारा हुकूमशहा ‘हिटलर’च आहे,’ अशी घणाघाती टीका जनशक्ती आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर व विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान यांनी केली.
येथे जनशक्ती आघाडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, नगरसेवक विक्रम पावसकर, श्रीकांत मुळे, बाळासाहेब यादव, अरुणा शिंदे आदी उपस्थित होते.
पावसकर म्हणाले, ‘मंगळवारी झालेल्या पालिकेच्या सभेवर आमच्या नगरसेवकांनी निवेदन देऊन बहिष्कार टाकला; पण पालिका सभेत आघाडीच्या अध्यक्षांनी लांबलचक भाषण ठोकत आमच्यावर टीका केल्याचे प्रसार माध्यमांकडून आम्हाला समजले. सुभाषकाकांना आत्ताच राग का आला, या प्रश्नाचे उत्तर वेगळे आहे. आम्ही सर्वसाधारण सभेवरती बहिष्कार टाकल्याचे निमित्त साधत बहुउद्देशीय सभागृहाच्या नामकरणास केलेल्या विरोधाचा राग त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता.
वास्तविक, या सभेला नामकरणाचा विषय ठरावाद्वारे मांडण्याचे त्यांचे प्रयोजन असल्याचे आम्हाला समजल्यानंतर आम्ही सभेवर बहिष्कार टाकला.
शहरातील विकासकामांसाठी यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी महोत्सवाचे निमित्त साधत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भरपूर निधी दिला. मात्र, प्रत्येक विकासकामांच्या उद्घाटन, लोकार्पण सोहळ्यावेळी त्यांचा साधा नामोल्लेखही केला जात नाही, ही दुर्दैवी बाब आहे.
याउलट ज्या आमदारांच्या हस्ते प्रत्येक कार्यक्रमाचे नारळ फोडता, त्या कार्यक्रमासाठी होणाऱ्या खर्चाएवढा निधी तरी त्या आमदाराने कऱ्हाड शहरातील विकासकामांसाठी दिला आहे का, याचा अभ्यास करा. दुसऱ्याने दिलेल्या निधीच्या पैशावर स्वत:ची प्रसिद्धी मिरवू नका,’ असा टोलाही पावस्करांनी लगावला.
स्मिता हुलवान म्हणाल्या, ‘लोकशाही आघाडीच्या अध्यक्षांना जनशक्ती आघाडीची खूप चिंता वाटताना दिसते. विरोधी पक्षनेता कोण असावा, हे तुम्ही ठरविण्याची गरज नाही.
याउलट आपल्या नगरसेवकांना सभागृहात पोहोचेपर्यंत सभागृहात आज कोणते विषय मांडले जाणार, याची कल्पना तरी देता का ? अशा कानपिचक्या दिल्या.
लोकशाहीचा खून करणाऱ्या आघाडीच्या अध्यक्षांनी आपल्या आघाडीचं नाव; पण हिटलरशाही आघाडी, असं ठेवलं तर बरं होईल.’ (प्रतिनिधी)
मंगळवारी झालेल्या पालिकेच्या सभेत सभागृह नामकरणाचा विषय वाचायला सुरुवात झाल्यानंतर अचानक एका नगरसेवकाला कुणाचा तरी फोन आला आणि त्याने मध्येच उठून विषय तहकूब ठेवा, असे सांगितले आणि मग नगराध्यक्षांनीही तो विषय तहकूब केला. त्या नगरसेवकाला कोणाचा फोन आला होता, याचा शोध घेतला तर हुकूमशहा कोण ते समजेल.
- स्मिता हुलवान
पतीच्या उचापती
एका नगरसेवकाला आपल्या पत्नीला नगराध्यक्ष करण्याचे डोहाळे लागले आहेत आणि धृतराष्ट्रासारखा तो त्या इच्छेपायी नको त्या उचापती करीत सुटला आहे. या पतीच्या उचापतींनी अनेकजण हैराण झाले असल्याची टीका पावसकर यांनी केली.
...अन् खुशाल हवं ते नाव द्या
दुसऱ्यांनी दिलेल्या निधीतून उभारण्यात आलेल्या सभागृहाला आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे नाव देण्याचा अट्टाहास सोडून द्या. तुमच्याकडे अनेक संस्था आहेत. स्वनिधी द्या आणि खुशाल कुटुंबातील हवं त्या व्यक्तीचं नाव द्या, असा सल्ला पावसकर यांनी दिला.