शटरच्या खालून व्यवसाय करणाऱ्यांना चाप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:40 AM2021-05-08T04:40:33+5:302021-05-08T04:40:33+5:30
पाचगणी : प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकान व्यावसायिक शटरच्या आतून चोरीछुपे व्यवसाय करणाऱ्या १० व्यावसायिकांवर ...
पाचगणी : प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकान व्यावसायिक शटरच्या आतून चोरीछुपे व्यवसाय करणाऱ्या १० व्यावसायिकांवर पाचगणी नगर परिषदेच्या भरारी पथकाने दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे अशा व्यावसायिकांना चाप बसला आहे.
कोरोनाचा संसर्ग अधिक झपाट्याने वाढत असल्याने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानदारांवर निर्बंध आले आहेत. त्यांनासुद्धा सकाळी ७ ते ११ या वेळेत प्रत्यक्ष विक्री न करता घरपोच सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अन्य व्यावसायिकांवर पूर्णतः निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काही व्यावसायिक निर्बंध झुगारून शटरच्या आतून चोरीछुपे व्यवसाय करीत आहेत.
ही बाब पाचगणी नगर परिषदेच्या फिरत्या भरारी पथकाच्या निदर्शनास आली. अशा १० व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नगर परिषदेच्या या भरारी पथकात सूर्यकांत कासुर्डे, नथू शिंदे, संतोष सावंत, शशी मोहिते यांचा समावेश होता. सकाळी या पथकास ही १० दुकाने अर्धवट शटरमधून व्यवसाय करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर शहरात विनामास्क फिरणाऱ्या अनेकांना याचा फटका बसला असून, त्यांच्यावरसुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात आली.
चौकट :
कोरोनाच्या काळात अनेक लहान व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यात कुटुंब चालवायचे म्हणजे अग्निदिव्यच असते. त्यातून शासनाचे निर्बंध असल्यामुळे असे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
फोट ०७पाचगणी
पाचगणी येथे अर्धवट शटर उघडे ठेवून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवर पालिकेच्या भरारी पथकाने दंडात्मक कारवाई केली. (छाया : दिलीप)