काँग्रेसचे प्राबल्य राष्ट्रवादी मोडीत काढणार?
By admin | Published: October 28, 2015 10:22 PM2015-10-28T22:22:22+5:302015-10-29T00:17:09+5:30
वाई तालुका : ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार जोमात; मतदारांच्या भेटीगाठी वाढल्या
संजीव वरे --वाई तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या केंजळ, जांभ आणि ओझर्डे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला आहे. बहुतेक निवडणुका राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील व किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत आहेत. मतदारांच्या गाठीभेटी वाढल्या असून, निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे.
वाई तालुक्यातील केंजळ, जांब, ओझर्डे, सुलतानपूर, वाघजाईवाडी व गोरेगाव या सहा ग्रामपंचायतींसह इतर आठ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होत आहेत. यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या केंजळ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पुरस्कृत किसन वीर कारखान्याचे संचालक प्रवीण जगताप यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून ११ जागांसाठी निवडणूक लढविली जात आहे. जांबमध्ये माजी सभापती प्रमोद शिंदे यांच्या नेतत्वाखाली चिलाईदेवी परिवर्तन पॅनेल व किसन वीर कारखान्याचे संचालक मधुकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चिलाईदेवी ग्रामविकास पॅनेल यांच्यात १३ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीसाठी लढत होत आहे. तर ओझर्डेमध्ये काँग्रेसकडून शेतकरी पॅनेलचे नेतृत्व हणमंतराव पिसाळ व सी. व्ही. काळे तर राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पिसाळ व तिसऱ्या ओझर्डे विकास आघाडीचे नेतृत्व दिलीप फरांदे करीत आहे. या ठिकाणी १५ जागांसाठी निवडणूक होत असून, उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटीगाठींवर जोर दिला आहे.
तिन्ही ठिकाणी राजकीय प्रचार वाढला असून, उमेदवारांचा मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्याकडे कल वाढला आहे. ग्रामपंचायतींवर आपली सत्ता स्थापन करण्यासाठी उमेदवारांचे कसोशीने प्रयत्न सुरू केले आहे.
निवडणुकीकडे तालुक्याच्या नजरा
केंजळ, जांब, ओझर्डे यासह इतर गावांमध्येही स्थानिक प्रश्नांवर निवडणुका लढविल्या जात आहे. तालुक्यात आजी-माजी आमदारांच्या नावावर व कॉँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून निवडणुका होत असून दुसऱ्या पक्षाचे अस्तित्व कोठेही दिसून येत नाही. महत्त्वाच्या तिन्ही ग्रामपंचायतींवर कॉँग्रेसचे प्राबल्य होते. राष्ट्रवादी हे प्राबल्य मोडीत काढणार की, कॉँग्रेस सत्ता अबाधित ठेवणार याकडे सपंूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होणार आहे.