लम्पीचा प्रादूर्भाव; सातारा जिल्ह्यात जनावरांचा बाजार अन् वाहतूक बंद
By नितीन काळेल | Published: August 28, 2023 06:50 PM2023-08-28T18:50:29+5:302023-08-28T18:50:55+5:30
जनावरांचे प्रदर्शन, यात्रा, बैलगाडा शर्यतीचे आयोजनावर पुढील आदेशापर्यंत मनाई
सातारा : जिल्ह्याच्या शेजारील सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव वाढला असून साताऱ्यातीलही चार तालुक्यात ४१ जनावरे बाधित झाली आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. या पार्श्चभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने गोवर्गीय जनावरांचा बाजार अन् वाहतूक बंदचा निर्णय घेतला आहे. तसेच बैलगाडी शर्यतीवरही बंदी आली आहे.
याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी आदेश निर्गमीत केला आहे. तर सातारा जिल्ह्या शेजारील सोलापूरमध्ये लम्पीच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यातच जनावरांच्या बाजारावर बंदी घालण्यात आली होती. याचदरम्यान, सातारा जिल्ह्यात लम्पी बाधित जनावरे सापडत होती. पण, प्रमाण कमी होते. सध्या मात्र हळूहळू बाधित जनावरांची संख्या वाढली आहे. त्यातच फलटण तालुक्यात सुरुवातीला पशुधन बाधित झाले. त्यानंतर कऱ्हाड आणि माण तालुक्यातील जनावरांना लम्पी रोगाने गाठले.
आता कोरेगाव तालुक्यातही बाधित जनावरे सापडली आहेत. यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व गोवर्गीय बाजार तसेच गोवर्गीय जनावरांच्या वाहतुकीवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाच्या या आदेशानुसार जिल्ह्यातील आठवडा बाजारात गोवर्गीय जनावरांची खरेदी, विक्री तसेच वाहतूक होणार नाही. तसेच जनावरांचे प्रदर्शन, यात्रा, बैलगाडा शर्यतीचे आयोजनही पुढील आदेशापर्यंत करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील फलटण, कऱ्हाड, कोरेगाव आणि माण तालुक्यातील ९ गावांमध्ये लम्पी चर्म रोगाची लागण झाली आहे. यामध्ये २६ गाई आणि १५ बैल असे मिळून ४१ जनावरांना लम्पीचा प्रादुर्भाव झाला आहे. तर एका जनावराचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, लम्पीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एकूण ३ लाख ५२ हजार ४३६ गोवर्गीय जनावरांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ३ लाख २३ हजार ६७ पशुधनाला लम्पी प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. उर्वरित जनावरांची लसीकरण मोहीमही वेगाने सुरु आहे. त्यामुळे गोवर्गीय जनावरांना लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.