कांद्याच्या दरात क्विंटलला दोन हजारांची घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:46 AM2021-03-01T04:46:31+5:302021-03-01T04:46:31+5:30
सातारा : बाजार समितीत चार दिवसांपूर्वी कांद्याचा दर ४५०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला होता. मात्र, दोनच दिवसात दोन हजाराने दर ...
सातारा : बाजार समितीत चार दिवसांपूर्वी कांद्याचा दर ४५०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला होता. मात्र, दोनच दिवसात दोन हजाराने दर खाली येऊन २५०० रुपये क्विंटलपर्यंत थांबला. यामुळे शेतकऱ्यांचा आनंद औटघटकेपुरताच ठरला. त्याचबरोबर इतर पालेभाज्यांचे दरही ढासळले आहेत. यामुळे शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून भाजीपाला येत असतो. मागील काही दिवसांपासून कांदा भाव खात होता. ४५०० रुपयांपर्यंत दर गेला होता. मात्र, रविवारी दरात दोन हजारांची घसरण झाली. कांद्याला एक हजारापासून २५०० रुपयांपर्यंत भाव आला, तर इतर पालेभाज्यांचे दरही कमी निघाले. रविवारी ६०८ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये वांग्याला १० किलोला १०० ते १५० रुपये दर आला. टोमॅटोला ६० ते ८० आणि कोबीला ३० ते ४० रुपये भाव आला. तसेच दोडका आणि कारल्याला १० किलोला २५० ते ३००, भेंडीला ३०० ते ४००, काकडीला १०० ते १५० रुपये दर मिळाला.
सूर्यफूल तेलात वाढ
मागील काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढलेलेच आहेत. या आठवड्यातही सूर्यफूल तेलात वाढ आहे. सूर्यफूल तेल डबा २२०० ते २३०० रुपयांना मिळत आहे. सोयाबीनचा २१५० पर्यंत, शेंगतेलाचा २२५० ते २४५० आणि पामतेल डबा १७८० ते १८३० रुपयांना मिळू लागलाय. सूर्यफूलमध्ये १०० रुपयांची वाढ आहे.
द्राक्षाची आवक वाढली...
सातारा बाजार समितीत सफरचंद, संत्री, चिक्कू, खरबूज, द्राक्षे, कलिंगड तसेच खरबुजाचीही आवक झाली. यामध्ये द्राक्षाची आवक वाढत असल्याचे दिसून आले.
साताऱ्यात गेल्या आठवड्यात कांद्याचा दर वाढला होता. पण, आता काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे ग्राहक म्हणून समाधानाची बाब आहे. तसेच इतर भाज्यांचे दरही आटोक्यात आहेत.
- रामकृष्ण पाटील, ग्राहक
सातारा बाजार समितीत चार दिवस कांद्याचा दर तेजीत होता. त्यामुळे आनंदाचे वातावरण होते. पण, एकदमच दर खाली आला. क्विंटलमागे दोन हजार रुपये कमी झाल्याने नाराज झालो.
- सीताराम पवार, शेतकरी
सूर्यफूल उत्पादक देशातच मालाचा तुटवडा आहे. त्यामुळे या आठवड्यात सूर्यफूल तेलाच्या दरात सरासरी १०० रुपयांची वाढ आहे. तसेच पाऊचमागे ५ रुपये वाढलेले आहेत. खाद्यतेलाचे दर तेजीतच आहेत.
- संजय भोईटे, दुकानदार