जिल्ह्याच्या शौर्याचा सार्थ अभिमान

By admin | Published: September 23, 2016 11:29 PM2016-09-23T23:29:16+5:302016-09-24T00:09:24+5:30

संभाजी पाटील-निलंगेकर : विक्रम पावसकर यांचा वाढदिवस उत्साहात

Pride of the district | जिल्ह्याच्या शौर्याचा सार्थ अभिमान

जिल्ह्याच्या शौर्याचा सार्थ अभिमान

Next

कऱ्हाड : ‘सातारा जिल्हा शूरांची आणि वीरांची भूमी आहे. मातीसाठी लढणाऱ्या अनेक जवानांनी वीरमरण पत्करले आहे. याचा सातारा जिल्ह्यासह आम्हाला सार्थ अभिमान आहे. या वीरमरण पत्करलेल्या जवानांच्या घरची आणि गावाची माती मुंबईत अरबी समुद्रामध्ये बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकापर्यंत पोहोचवा. या मातीचे कलश स्मारकापर्यंत पोहोचविण्याची सुरुवात विक्रम पावसकरांच्या पुढाकारातून येथील मावळे करतील,’ असा विश्वास कामगार व भूकंप पुनर्वसन विभागाचे मंत्री संभाजीे पाटील-निलंगेकर यांनी व्यक्त केला. तसेच विक्रम पावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.
कऱ्हाड येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जाहीर सत्कार समारंभात ते बोलत
होते.
यावेळी विक्रम पावसकर व रिओ आॅलिम्पिक पटू ललिता बाबर यांचा सत्कार मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे, भरत पाटील, मनोज घोरपडे, नीता केळकर, विनायक पावसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शेखर चरेगावकर म्हणाले, ‘आजचा विक्रम पावसकर यांचा वाढदिवस प्रथमच मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. काहींना प्रश्न पडला असेल की, यंदाचा वाढदिवस मोठा का? उगाच ताकाला जाऊन भांडं लपविण्यात अर्थ नाही. आज जे भगवं वादळ मोठ्या प्रमाणात दिसतंय ना ते पालिका निवडणुकीत आपणाला कायम ठेवायचं आहे. आम्ही तयारीला लागलोच आहे. तुम्हीही नगरपालिकेत कमळ फुलविण्यासाठी कामाला लागा.’
विक्रम पावसकर म्हणाले, ‘मंत्री पाटील यांनी आज कऱ्हाड शहरातील रस्त्यांची दुरवस्था पाहिली आहे.
तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतेच आठ कोटी रुपये निधी कऱ्हाडसाठी दिल्याचे त्यांनी सांगितले. कऱ्हाडकरांनी जर भाजपवरील विश्वास वाढविला तर या आठच्या पुढे आणखी एक शून्य वाढू शकतो.’ (वा.प्र)
भूकंप आणि पुनर्वसन...
‘आजच्या या कार्यक्रमाला राज्याचे भूकंप व पुनर्वसन मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर आवर्जून उपस्थित आहेत. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत विक्रम पावसकरांच्या नेतृत्वाखाली राजकीय भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही,’ असे सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी सांगताच टाळ्या आणि शिट्ट्यांचा प्रतिसाद मिळाला. त्यावर चरेगावकर यांनी मंत्री पाटील यांच्याकडे बघत पराभूत विरोधकांचे पुनर्वसन करायला तुम्हालाच बोलवू, असे वक्तव्य करताच हशा पिकला.
तुम्ही मेहरबान, आम्ही नगरसेवक!
हिंदू एकता आंदोलनाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विनायक पावसकर यांनी आपल्या भाषणात आम्हाला मेहरबान म्हणून मिरवायला आवडत नाही. उलट सुज्ञ मतदार आमच्यावर मेहरबान झाले म्हणून मला आणि विक्रमला तुमचे नगरसेवक म्हणून काम करायला संधी मिळाली. भविष्यात राजकारणामध्ये मोठी संधी मिळाली तरी आपला सेवक भाव कमी होणार नाही, असे सांगताच अवघा परिसर ‘जय शिवाजी, जय भवानी’च्या घोषणांनी दुमदुमून गेला.
ललिता बाबरला लाखाचा धनादेश
रिओ आॅलिम्पिकमधील खेळाडू ललिता बाबरला यावेळी १ लाख १ हजाराचा धनादेश प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ललिता बाबर म्हणाली, ‘खेळाडूंना असा पाठिंबा मिळत गेला तर अनेक ललिता तयार होतील. मात्र, मुलींना चूल आणि मूल यापुरते मर्यादित ठेवू नका.’

Web Title: Pride of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.