पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सातारा दौरा पुढे ढकलला..
By नितीन काळेल | Published: February 12, 2024 07:05 PM2024-02-12T19:05:18+5:302024-02-12T19:05:55+5:30
१९ फेब्रुवारीचे होते नियोजन
सातारा : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात जिहे कटापूर पाणी योजना जलपूजन आणि अन्य कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. १९ फेब्रुवारीला सातारा दौऱ्यावर येणार होते. पण, काही कारणांनी हा दाैरा पुढे गेल्याची माहिती मिळत आहे. आता या कार्यक्रमासाठी नवीन तारीख लवकरच मिळेल, असा आशावादही भाजपच्यावतीने व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील माण आणि खटाव तालुक्यासाठी जिहे कठापूर पाणी योजना महत्वपूर्ण ठरलेली आहे. या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू दिवंगत लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना असे नाव देण्यात आलेले आहे. या योजनेच्या जलपूजन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. १९ फेब्रुवारीला सातारा जिल्हा दाैऱ्यावर येणार होते. या दाैऱ्यात ते माणमधील आंधळी धरण येथे जलपूजन करणार होते. तसेच सातारा येथेही एक कार्यक्रम नियोजित करण्यात आला होता.
पंतप्रधान मोदी माण तालुक्यात येणार असल्याने प्रशासनाने मागील आठवड्यापासून तयारी करण्यास सुरूवात केली होती. यामध्ये हेलिपॅड, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आदी कारणांसाठी धावपळ सुरू होती. तसेच राजकीय वर्तूळातही जोरदार चर्चा सुरू झाली होती. पण, आता पंतप्रधान मोदी यांचा १९ फेब्रुवारीचा दाैरा पुढे ढकलण्यात आला आहे. काही कारणांनी ते सातारा दाैऱ्यावर येणार नाहीत. पण, पुढील काही दिवसांतच त्यांच्या दाैऱ्यासंबंधीत नवीन तारीख मिळणार आहे. त्यामुळे दि. १९ फेब्रुवारीला नसेल तर येत्या काही दिवसांतच जिहे कठापूर योजनेतील पाण्याचे पूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होईल, अशी माहिती मिळत आहे.