नवीन वर्षाचे अभिनव स्वागत, 'त्यांनी' कोरेगावात ऑक्सिजन पार्क उभारण्याचा केला निर्धार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 03:54 PM2022-01-04T15:54:48+5:302022-01-04T15:58:37+5:30
प्राचार्य डॉ. नितीन मोहिरे यांनी कोरेगाव औद्योगिक वसाहत परिसरात दोन हजार बावीस झाडे लावण्याचा संकल्प करत ऑक्सिजन पार्क उभारण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे.
साहिल शहा
कोरेगाव : कोरेगावसारख्या निमशहरी गावातून वृक्षारोपण चळवळ खेडोपाडी पोहोचविणाऱ्या आसनगाव (ता. शहापूर) येथील प्राचार्य डॉ. नितीन मोहिरे यांनी नवीन वर्षाचे स्वागत अत्यंत अभिनव पद्धतीने केले. मित्रमंडळींचे सहकार्य आणि नवनवीन कल्पना प्रत्यक्ष आणणाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन यामुळेच मोहिरे यांनी कोरेगाव औद्योगिक वसाहत परिसरात दोन हजार बावीस झाडे लावण्याचा संकल्प करत ऑक्सिजन पार्क उभारण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे.
शनिवार, १ जानेवारी कोरेगाव-रहिमतपूर रस्त्याकडेला असलेल्या लघू औद्योगिक वसाहत परिसरातील खुल्या जागेवर ट्रॅक्टरला बसवलेल्या हॉपरच्या साह्याने मोठमोठे खड्डे घेऊन झाडे लावण्याचे काम दिवसभर सुरू होते. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या पक्षीय संघटनांचे लेबल बाजूला ठेवून निव्वळ वृक्षारोपण करण्यात अग्रेसर होते.
आपल्या आई-वडिलांचे आदर्श घेऊन कोरेगाव शहरात काम करत असलेले नितीन मोहिरे यांनी शिक्षकी पेशा जोपासत वृक्षारोपण चळवळ बळकट केली आहे. आई, पत्नी व लहान मुलींसह संपूर्ण कुटुंबीय या उपक्रमात भाग घेत असते.
नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रत्येक उमेदवारास शंभर झाडे लावण्याचे आवाहन केले होते, त्यास अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. नवीन वर्षाचे स्वागत करत असताना दोन हजार बावीस झाडे लावण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. त्यांनी ही गोष्ट आपल्या नजीकच्या सहकाऱ्यांसह मित्रमंडळीजवळ बोलून दाखविली. क्षणात सर्वांनी होकार देताच निधीची जुळवाजुळव झाली. ट्रॅक्टरच्या जोडीला अवजड अशा हॉपरची व्यवस्थाही काही वेळातच झाली.
कोरेगावच्या औद्योगिक वसाहत परिसरात दररोज शहरातील नागरिक पहाटे आणि सायंकाळी फिरावयास येतात, त्यांची वर्दळ असते, ही बाब लक्षात घेऊन या परिसरात वृक्षारोपण करण्याचा निर्धार करण्यात आला. पाण्याचा प्रश्न पुढे आला; मात्र ठिबक सिंचन यंत्रणा कार्यान्वित करून झाडे जगविण्याचा निर्णय घेतला गेला. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ज्येष्ठ तंत्र शिक्षकांबरोबर कोरेगावच्या मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप दीक्षित यांनी पुढाकार घेतला.
त्यानंतर कोरेगावातील सामाजिक कार्यकर्ते राहुल बर्गे, डॉ. विघ्नेश बर्गे, रोहित वाघमारे, सागर भुंजे, नितीन बर्गे, करुणेश दायमा, प्रा. नितीन उलमेक, दादा इदाते यांच्यासह असंख्य युवक कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण चळवळीस हातभार लावला. औद्योगिक वसाहत परिसरात नारळ, आंबा, चिकूची प्रत्येकी शंभर तर बकुळ आणि कडुनिंबाची प्रत्येकी ५० झाडे लावण्यात आली.
जगावर कोरोनाचे संकट कायम असून, कोरोना काळात सातत्याने ऑक्सिजनची मागणी वाढत जाते, ही बाब लक्षात घेऊन कोरेगावात ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प केला. त्या सर्वांनी प्रतिसाद दिला. - प्राचार्य डॉ. नितीन मोहिरे