कऱ्हाडात मटका अड्ड्यावर छापा
By admin | Published: January 15, 2017 01:00 AM2017-01-15T01:00:32+5:302017-01-15T01:00:32+5:30
सतरा बुकींना अटक : पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त; उपअधीक्षक पथकाची कारवाई
कऱ्हाड : शहरातील कृष्णा कॅनॉल परिसरातील मटक्याचा मुख्य अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. यावेळी मटका घेणाऱ्या तब्बल सतरा बुकींना अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून पावणेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा करण्यात आली.
सुनील वासुदेव बेलवणकर (वय ४६), नदीम खालिद बागवान (२३), अय्याज शब्बीर शेख (२८), राहुल शामराव पाटील (३७), जुबेर यासीन पटेल (२८), तात्यासाहेब हणमंत सावंत (३१), जावेद अस्लम पठाण (३२), युनूस महंमद तांबोळी (४८), असद युसूफ पठाण (२१), मोईन अल्ताफ पठाण (२१), मोहनकुमार बाळकृष्णा बुराडे (४३), रमेश गजानन शिंदे (५२), सुहेल सलीम पटेल (३३, सर्व रा. कऱ्हाड), रणजित दिलीप मोरे (३६), फिरोज याकुब शेख (३६), अनिल सदाशिव वीर (३०) तिघेही, रा. मलकापूर), विशाल हणमंत सावंत (२७, रा. खोडशी) अशी पोलिसांनी अटक केलेल्या मटका बुकींची नावे आहेत.
कऱ्हाडलगत कृष्णा कॅनॉलनजीक सैदापूर येथे शंकर कांतिलाल कणसे यांच्या मालकीची दुमजली इमारत आहे. या इमारतीत शहरासह परिसरातील मटका बुकी एकत्र येत असून, ती इमारत म्हणजे मटक्याचे मुख्य केंद्र आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला संबंधित इमारतीवर छापा टाकण्याचे आदेश दिले.
शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उपअधीक्षक शिवणकर यांच्यासह पथक त्या ठिकाणी पोहोचले. पथकाने इमारतीवर छापा टाकला. त्यावेळी पंधरा ते वीस बुकी वेगवेगळ्या गोल टेबलवर बसून मटका घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले. तसेच टेबलवर पडलेल्या मटक्याच्या चिठ्ठ्या, रोकड व इतर साहित्य हस्तगत केले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. शहरानजीकच मटक्याचा हा मुख्य अड्डा असल्याने येथून दिवसाकाठी लाखोची उलाढाल होत असल्याचे पोलिस तपासांतून समोर येत आहे. या कारवाईने मटका बुकींमध्ये खळबळ उडाली आहे. कारवाईची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे.