महाबळेश्वरच्या पर्यावरणपूरक विकासासाठी प्राधान्य द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:43 AM2021-01-16T04:43:37+5:302021-01-16T04:43:37+5:30
सातारा : महाबळेश्वरचा पर्यटन विकास करताना तो पर्यावरणपूरक होईल यावर भर देण्यात यावा. महाबळेश्वरची पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी वेण्णा ...
सातारा : महाबळेश्वरचा पर्यटन विकास करताना तो पर्यावरणपूरक होईल यावर भर देण्यात यावा. महाबळेश्वरची पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी वेण्णा तलावाची उंची वाढविणे, तलाव परिसराचा विकास करणे, शॉपिंग परिसराचा विकास करणे तसेच महाबळेश्वरच्या भागात पोलो ग्राउंड तयार करणे या कामांचे प्रस्ताव जलदगतीने सादर करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
महाबळेश्वरचा पर्यटन विकास करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाबळेश्वरच्या पर्यटन विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे, मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, आदी मान्यवर उपस्थित होते. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह हे ऑनलाईन उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, महाबळेश्वर पर्यटन आराखडा तयार करताना कमी कालावधी आणि अधिक कालावधी स्वरूपात आराखडा करून कामाची वर्गवारी करावी व त्याची टप्पानिहाय अंमलबजावणी करावी. असे करताना कमी कालावधीची जी कामे तत्काळ हाती घेता येतील त्यावर लक्ष केंद्रित करावे. महाबळेश्वर मार्केट, रस्ता रुंदीकरण व लेक परिसर यांची कामे जी तत्काळ सुरू करता येतील, ती कामे पहिल्या टप्प्यात हाती घ्यावीत.
पर्यटनाला दर्जा राहावा, पर्यटकांना उत्तम सोयी-सुविधा मिळाव्यात व त्या माध्यमातून पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी स्थानिकांना विश्वासात घेऊन ही कामे करावीत. वन, पर्यावरण, पर्यटन विभागाने मिळून समन्वयाने महाबळेश्वर पर्यटन आराखड्याची कामे करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
महाबळेश्वरमध्ये पोलो मैदान करता येऊ शकेल. ही जागा वन विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे नगर पंचायतीने हा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. वेण्णा लेकचा परिसर ३१ जानेवारीपर्यंत सुशोभित करावा. महाबळेश्वरमध्ये विविध प्रकारच्या पर्यटनाला मोठा वाव आहे. यात साहसी पर्यटन, निसर्ग पर्यटन, हेरिटेज पर्यटन, धार्मिक आणि कृषी पर्यटन यासारख्या क्षेत्रांचा समावेश करता येईल. आताच्या महाबळेश्वरमध्ये पहिल्या टप्प्यात मार्केट आणि लेक परिसराचे काम हाती घ्यावे. महाबळेश्वरमध्ये ५ एमएलटी पाणी क्षमता आहे, ती १९ एमएलटीपर्यंत वाढवता येऊ शकेल; त्यामुळे तलावाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव सादर करून त्यास मंजुरी घ्यावी. बाजारामधून पाणी निचरा होणारे नाले बंदिस्त करावेत;, त्यामुळे रस्त्याची रुंदी वाढून त्यात एकसमानता आणण्यास मदत होईल, अशा सूचना यावेळी दिल्या.
पर्यटनमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले की, राज्याचा विकास करताना तो पर्यावरणपूरक व्हावा यावर भर दिला जात आहे. महाबळेश्वरसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागाचा विकास करताना पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनवाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास याचा समतोल साधला जाईल हे पाहणे गरजेचे आहे.
चौकट
पायाभूत सुविधा वाढविण्याची गरज
सध्याच्या पायाभूत सुविधा २०११ च्याच आहेत. २००१ मध्ये महाबळेश्वर हे इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर झाले. देशातील हा पहिला इको सेन्सेटिव्ह झोन असून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे. २०१४ मध्ये प्रमुख पर्यटन आराखडा तयार केला; पण तो विषय नंतर पुढे गेला नाही. महाबळेश्वरमध्ये रोज १७ ते १८ हजार पर्यटन क्षमता आहे, परंतु हंगामामध्ये ३५ ते ४० हजार पर्यटक येतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली.