जिल्हा कारागृहात बंदिवानाला बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 10:19 AM2020-01-09T10:19:39+5:302020-01-09T10:24:08+5:30
सातारा येथील जिल्हा कारागृहातील एका बंदिवानाला मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बंदिवानांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. साहेबांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून बंदिवानाला मारहाण झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
सातारा : येथील जिल्हा कारागृहातील एका बंदिवानाला मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बंदिवानांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. साहेबांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून बंदिवानाला मारहाण झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
विष्णू भगवान केकाण, विजय बाळू माने, भारत कमलाकर जाधव, सुरज मारूती धस, आकाश खुशालसिंग चव्हाण, अतुल सतिश क्षीरसागर, शाम सहदेव यतानळकर (सर्व रा. जिल्हा कारागृह)अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, रुपेश उर्फ पप्पू शिवाजी चव्हाण (रा. आभेपुरी, ता. वाई सध्या रा. जिल्हा कारागृह) हा कारागृहातील दवाखान्यात झाडलोट करण्याचे काम करतो. तो नेहमीप्रमाणे मंगळवारी दवाखान्यात झाटलोट करत असताना यातील संशयित केकाण हा दवाखान्यात आला होता.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला काही गोळ्या खाण्यास दिल्या व त्या त्यांच्यासमोरच खा, असे सांगितले होते. तरीही केकाणे हा गोळ्या खात नव्हता. त्यामुळे चव्हाण याने त्याला गोळ्या का खात नाहीस, असे विचारले, त्यामुळे चिडलेल्या केकाणे याने तू साहेबांचा खबऱ्या आहेस, तूला बघतोच, अशी धमकी दिली. त्यानंतर चव्हाण हा सायंकाळी सहाच्या सुमारास कारागृहातील बराक क्रमांक एक येथे गेल्यानंतर केकाणे याने त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली.
यावेळी इतरही संशयितांनी चव्हाण याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. त्यानंतर जखमी चव्हाण याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार केल्यानंतर पुन्हा त्याला कारागृहात नेण्यात आले. सातारा शहर पोलिसांनी कारागृहात जाऊन त्याचा जबाब नोंदवला असून, सहायक फौजदार एस. ई. पवार हे अधिक तपास करत आहेत.