‘कृष्णे’त पृथ्वीराज चव्हाण सक्रिय !
By admin | Published: June 17, 2015 10:01 PM2015-06-17T22:01:09+5:302015-06-18T00:44:52+5:30
उंडाळकर पिता-पुत्रांच्याही जोर बैठका : एन. डी. पाटील, पंतगराव कदम, भारत पाटणकरांच्याही सभा
प्रमोद सुकरे -कऱ्हाड -यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यंदा प्रथमच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सक्रिय झाले आहेत. माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर व त्यांचे पुत्र उदय पाटील यांनीही बैठका घेत जोर बैठका सुरू केल्या आहेत. तर ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, डॉ. भारत पाटणकरांच्या सभांनी प्रचारात रंगत आली आहे. दिल्लीत रमणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांनीही विधानसभेची निवडणूक जिंकल्यापासून आपल्या मतदारसंघात चांगलेच लक्ष घातल्याचे पाहायला मिळते. जवळजवळ दर शनिवार-रविवार कऱ्हाडात येऊन त्यांनी संपर्क वाढविला आहे. त्याही पुढे जाऊन मतदारसंघाशी संबंधित असणाऱ्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी प्रथमच लक्ष घातले आहे. मदनराव मोहिते यांच्या नेतृत्वाखालील रयत पॅनेलच्या प्रचारासाठी बुधवारी काले येथे त्यांची जाहीर सभा झाली. गुरुवारी कार्वे, वारुंजी, विंग जिल्हा परिषद मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या तीन बैठका घेतल्या असून, शुक्रवारी वाठार येथे होणाऱ्या जाहीर सभेलाही ते मार्गदर्शन करणार आहेत.
यशवंतराव मोहितेंचे मानसपुत्र माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम महिन्याभरापासून ठिकठिकाणी प्रचारात दिसत आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील वैर बाजूला ठेवून विलासराव पाटील-उंडाळकर गटाने डॉ. सुरेश भोसले गटाशी पुन्हा मैत्रिपर्व सुरू केले आहे. कृष्णेच्या निवडणुकीत त्यांनी डॉ. सुरेश भोसलेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. स्वत: विलासराव पाटील-उंडाळकर व त्यांचे पुत्र उदय पाटील कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन सहकार पॅनेलच्या विजयासाठी जोर बैठका काढीत आहेत. प्रचारसभांना प्रतिसादही चांगला मिळतोय.
दिग्गज उमेदवार, प्रचारक अन् हायटेक प्रचार !
तिरंगी होणाऱ्या या निवडणुकीत कृष्णेचे विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्यासह माजी अध्यक्ष व कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष व कृष्णेचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, कृष्णेचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांच्यासह अनेक आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य प्रत्यक्ष उमेदवार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील प्रचारात उतरले आहे. तर प्रचार गीते, एल. ई. डी. प्रोजेक्टरच्या माध्यमातून चित्रफिती अन् सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हायटेक प्रचार सुरू आहे.

सन १९८९ मध्ये यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले यांच्यात कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून संघर्ष सुरू झाला. त्यावेळी विलासराव पाटील-उंडाळकरांनी भोसलेंची पाठराखण करीत जाहीर सभांमधून सहभाग घेतला होता. त्यानंतर कृष्णेच्या निवडणुकीत नेहमीच त्यांनी भूमिका घेतली; पण पडद्यामागे राहून.