बिबट्याशी झुंज देत वाचविले लेकराचे प्राण, पृथ्वीराज चव्हाणांनी केले धाडसाचे कौतुक; शासन करणार उपचाराचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 07:05 PM2022-01-22T19:05:31+5:302022-01-22T19:14:24+5:30
बिबट्याशी झुंज देत मृत्युच्या दाढेतूनही आपल्या लेकराचे वाचविले प्राण
कऱ्हाड : किरपे (ता. कऱ्हाड) येथील धनाजी देवकर या शेतकऱ्याच्या मुलावर गुरुवारी (दि-२०) बिबट्याने हल्ला केला. यावेळी या धाडसी बापाने बिबट्याशी झुंज देत मृत्युच्या दाढेतूनही आपल्या लेकराचे प्राण वाचविले. धनाजी देवकर यांच्या या धाडसाबद्दल माजी मुख्यमंत्री, कऱ्हाड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी फोनवरून कौतुक करीत त्यांना धीर दिला.
आमदार चव्हाण काही कामानिमित्त मुंबईला असल्याने त्यांनी फोनवरून त्या पित्याची चौकशी केली व त्यांना धीर देत मुलाच्या उपचाराचा खर्च शासन करील, असे सांगितले. तसेच चव्हाण यांनी वनअधिकाऱ्यांशी चर्चा करीत बिबट्याचा वारंवार होत असलेला उपद्रव टाळण्यासाठी वनविभागाने या भागात पिंजरे लावून बिबट्यांना पकडून जंगलात सोडण्याची व्यवस्था करावी. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाच्या उपचाराचा खर्च शासनाने करावा, असे सुचवले. याबाबत स्वतःसुद्धा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा वावर असलेल्या भागात जाऊन तेथील ग्रामस्थांचे भीतीचे वातावरण कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी चर्चा कराव्यात, तसेच पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशा सूचना आमदार चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
बिबट्याचा मानवी वस्तीत वाढत असलेला वावर यासाठी चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करीत वनविभागाकडून योग्य उपाययोजना बिबट्याचा वावर असलेल्या भागात केल्या जाव्यात. तसेच वनविभागाच्या तालुका अधिकाऱ्यांना पिंजरे लावण्याचे अधिकार दिले जावेत, तसेच कराड तालुक्यात संक्रमण उपचार केंद्र उभारण्याचा वनविभागाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून, त्यास तत्काळ मंजुरी मिळावी, अशा मागण्या पत्राव्दारे केल्या.