...म्हणून त्यांना राम मंदिराचा मुद्दा पुन्हा आठवतोय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 12:08 PM2018-11-25T12:08:43+5:302018-11-25T12:14:05+5:30
'भाजपाने विकासाची दाखविलेली स्वप्ने भंग पावली आहेत. विकासाचे सर्व मुद्दे फोल ठरल्यानेच सेना-भाजपाला आता पुन्हा राम आठवतोय. मात्र रामाच्या नावावर पुन्हा मते मिळणार नाहीत,'
कराड - 'भाजपाने विकासाची दाखविलेली स्वप्ने भंग पावली आहेत. विकासाचे सर्व मुद्दे फोल ठरल्यानेच सेना-भाजपाला आता पुन्हा राम आठवतोय. मात्र रामाच्या नावावर पुन्हा मते मिळणार नाहीत,' असे परखड मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे त्यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, आमदार विश्वजित कदम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, शहराध्यक्ष आप्पा माने, अशोकराव पाटील, सुनील पाटील आदींची उपस्थिती होती.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्याचे काम केले आहे. त्यांच्या विचारांची जोपासणा करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरणार आहे.' मराठा आरक्षणाच्या निर्णयाबाबत बोलताना ते म्हणाले. 'मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. या आरक्षणाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांना मिळाले तरी हरकत नाही; पण आरक्षणप्रश्नी मराठा समाजाची फसवणूक करू नका, अन्यथा उद्रेक होईल,' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.