साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील प्रचारात; उमेदवारीचं ठरलं तेव्हा पाहूची भूमिका
By नितीन काळेल | Published: March 26, 2024 06:18 PM2024-03-26T18:18:24+5:302024-03-26T18:19:24+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी समन्वय समिती..
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला नसला तरी ३० मार्च ते १ एप्रिलदरम्यान जिल्ह्यातील नेते विधानसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात करणार आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार श्रीनिवास पाटीलही सहभागी होणार आहेत. यामुळे आघाडीने प्रचाराची रणनीतीच ठरविल्याचे स्पष्ट होत आहे.
लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होऊन १० दिवस उलटून गेले आहेत. तरीही सातारा लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडी तसेच महायुतीचाही उमेदवार ठरलेला नाही. आघाडीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे मतदारसंघ आहे. तर युतीत भाजप की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मतदारसंघ मिळणार हे स्पष्ट नाही. त्यातच दोन्ही पक्षाकडूनही मतदारसंघ मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. महायुतीचा उमेदवार कोण असणार यावरच शरद पवार यांचाही उमेदवार ठरणार हे स्पष्ट होत आहे. तरीही प्रचारात आपण मागे राहायला नको, उमेदवार कोणी का असेना आपण एकसंध आहोत, हे दाखविण्याच्या प्रयत्नात आघाडीतील नेते आहेत.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्यासह आघाडीचे नेते आणि प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या मेळाव्यातून नेते हे लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. यामुळे महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी केल्याचेही स्पष्ट होत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी समन्वय समिती..
सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची जिल्हा समन्वय समिती तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये आघाडीतील प्रमुख तीन राजकीय पक्षांचे प्रत्येकी तीन प्रतिनिधी, छोटे पक्ष व सामाजिक संघटनांचा एक असे मिळून सहा प्रतिनिधी आहेत. म्हणजे या समितीत १५ जण आहेत. त्याचबरोबर प्रत्येक तालुकानिहायही समन्वय समिती तयार करण्यात आलेली आहे.