पृथ्वीराज चव्हाणांनी दिले देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद; कराड तालुक्यात चर्चा
By प्रमोद सुकरे | Published: July 21, 2023 06:36 PM2023-07-21T18:36:25+5:302023-07-21T18:37:35+5:30
कराडच्या विमानतळाबाबत फडणवीस सकारात्मक
कराड : राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी काँग्रेसचे नेते आमदार अशोक चव्हाण यांनी राज्यातील २८ विमानतळांच्या कामांबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली. राज्याच्या मध्यवर्ती भागात एक एअरपोर्ट असणे आवश्यक असून राज्यातील २८ विमानतळांसहकराड येथे एअरपोर्ट सुरु करण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल. अशी सकारात्मक भुमिका मांडली.त्याच्या उत्तरानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांना भर सभागृहात धन्यवाद दिले. त्याचीच आज कराड तालुक्यात चर्चा सुरू आहे.
फडणवीस म्हणाले, यासाठी एक कमिटी देखील स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे विमानतळांच्या ठिकाणी असलेल्या स्थानिकांच्या अडचणी पाहून त्या सोडवल्या जातील. तसेच हेलिपॅड देखील बनवण्यात येईल.
अधिवेशनात विमानतळांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काही वर्षांपूर्वी कोल्हापूरला मोठा पूर आला होता. त्यावेळी पुरामुळे कोल्हापूरचा एअरपोर्ट वापरता येत नव्हता. त्यामुळे कराड सारख्या मध्यवर्ती भागात एअरपोर्टची गरज निर्माण झाली. परंतू तेथील लोक जमिन देण्यास विरोध करीत आहेत. हा प्रश्न लवकरच सोडविण्यात येईल.
विमानतळाचा विषय महत्वाचा : चव्हाण
उपमुख्यमणी फडणवीसांना धन्यवाद देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आपण कराडच्या विमानतळाबाबत सकारात्मक भूमिका मांडली. महाराष्ट्रातील तालुक्याच्या ठिकाणचे पहिले विमानतळ दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी कराड येथे याच करिता केले होते कि ते अत्यंत महत्वाचे आणि मध्यवर्ती ठिकाण आहे. कराडच्या विमानतळाला गावकऱ्यांचा विरोध नाही तर त्याला काही निधी पाहिजे. त्याबद्दल शासनाने बैठक लावली तर तो प्रश्न मार्गी लागेल.
पतंगराव कदमांनी केली होती नाईटलँडिंगची सोय
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून कराडचे विमानतळ सुरू झाले. मात्र या ठिकाणी फक्त दिवसाच विमान उतरू शकत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर तत्कालीन उद्योग मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी नाईटलँडिंग ची सोय केली होती.