मोहितेंच्या ‘मनोमिलन’ प्रक्रियेतून ‘पृथ्वीराज’ बाहेर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:45+5:302021-06-09T04:48:45+5:30
कऱ्हाड : कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांचे मनोमिलन व्हावे, त्यांनी एकत्रित निवडणुकीला ...
कऱ्हाड : कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांचे मनोमिलन व्हावे, त्यांनी एकत्रित निवडणुकीला सामोरे जावे यासाठी मी खूप प्रयत्न केले. मात्र, त्याला यश आले नाही. आता मी या प्रक्रियेतून बाहेर पडत आहे. पुढचा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी व्यक्त केले. त्यामुळे आता मनोमिलनाची शक्यता धूसर झाली, असेच म्हणावे लागेल.
सातारा व सांगली जिल्ह्यांतील चार तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. कारखान्याची सत्ता सध्या डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांच्या सहकार पॅनेलकडे आहे. भोसले हे राजकीयदृष्ट्या भाजपवासी असल्यामुळे त्यांना रोखण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्य सहकारमंत्री विश्वजित कदम, अॅड. उदयसिंह पाटील यांनी पुढाकार घेत डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्यात मनोमिलनाचा प्रयत्न चालविला होता.
गेल्या चार ते पाच महिन्यांत दोन माजी अध्यक्ष मोहितेंच्या मनोमिलनासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, कऱ्हाड येथे नेत्यांच्या उपस्थितीत सुमारे आठ ते दहा बैठका झाल्या. या दोघांच्यात ‘संगम’ व्हावा, म्हणून रविवारी रात्री कऱ्हाडातही एक बैठक झाली. पण या बैठकीतूनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने पृथ्वीराज चव्हाण नाराज झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी मनोमिलनाच्या या चर्चेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी, तुमच्या निकटवर्तीयांनी कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत, याकडे लक्ष वेधले असता, त्याबद्दल आता मी काही बोलणार नाही, असे चव्हाण यांनी सांगीतले. कारखाना निवडणुकीत तुमची नक्की काय भूमिका राहणार, याबाबत छेडले असता तेही त्यांनी स्पष्ट केले नाही.
पण पृथ्वीराज चव्हाणांनी या चर्चेतून माघार घेतल्याने संभाव्य मनोमिलनाची शक्यता धूसर झाली आहे, असेच म्हणावे लागेल. त्यातच डॉ. इंद्रजित मोहिते यांनी आपल्या रयत पॅनेलचा व अविनाश मोहिते यांनी संस्थापक पॅनेलचा स्वतंत्र प्रचारही सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे कृष्णात तिरंगी लढतीची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. अजून अर्ज माघारीला १७ जूनपर्यंत मुदत आहे. त्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
- चौकट
चर्चेचं गुऱ्हाळ; पण रस नाही..!
रयत पॅनेलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते व संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनासाठी अनेक बैठका झाल्या. नेते, कार्यकर्त्यांच्याही चर्चा झाल्या. यातील बहुतांश चर्चेला पृथ्वीराज चव्हाण स्वत: होते. पण या चर्चांतून रस बाहेर पडत नसल्याचे चव्हाणांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच त्यांनीही मनोमिलनात आपल्याला ‘रस’ नसल्याचे आपल्या बोलण्यातून दाखवून दिले आहे.
- चौकट
ते तुम्हाला नंतर खासगीत सांगतो..
तुम्ही राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तेथे तीन पक्षांना तुम्ही एकत्र आणले. मग येथे दोन नेत्यांना एकत्र आणण्यात काय अडचण आली, याबाबत छेडताच ‘ते मी तुम्हाला नंतर खासगीत सांगतो’, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. त्यावर उपस्थितांमध्ये खसखस पिकली.