कार्यकर्त्यांच्या बैठकीत 'पृथ्वीराजां'चे आघाडीचे संकेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:23+5:302021-06-02T04:29:23+5:30

प्रमोद सुकरे कराड कृष्णा कारखाना निवडणूक पार्श्वभूमीवर सोमवारी कराडात तालुक्यातील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक झाली. या बैठकीत माजी ...

Prithviraj's lead signals in party workers' meeting! | कार्यकर्त्यांच्या बैठकीत 'पृथ्वीराजां'चे आघाडीचे संकेत!

कार्यकर्त्यांच्या बैठकीत 'पृथ्वीराजां'चे आघाडीचे संकेत!

Next

प्रमोद सुकरे

कराड

कृष्णा कारखाना निवडणूक पार्श्वभूमीवर सोमवारी कराडात तालुक्यातील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक झाली. या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक-दोन उमेदवारांच्या संदर्भातील चर्चा होणे बाकी आहे. येणाऱ्या दोन दिवसांत तो विषय संपून जाईल, असे सांगत डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या आघाडीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीत यावेळी रंगत निर्माण होण्याची शक्यता आहे.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने सुमारे दोन महिन्यांपूर्वीही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अशीच काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील एका सभागृहात कार्यकर्त्यांचा 'संगम' झाला होता. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. कार्यकर्त्यांनीही डॉ. इंद्रजित मोहिते अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनाची गरज व्यक्त केली होती. कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेऊन पृथ्वीराज चव्हाण यांनी मी प्रयत्न करतो, तुम्ही थोडे थांबा; असे सांगितले होते.

डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या एकत्रीकरणासाठी मग आमदार पृथ्वीराज चव्हाण, राज्य सहकारमंत्री विश्वजित कदम, रयत साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील यांनी पुढाकार घेतला. मुंबई, कोल्हापूर, कराड येथे यासाठी सात ते आठ बैठका झाल्या; पण त्यांचा अंतिम निर्णय कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेला नाही.

दरम्यान, कारखान्याची निवडणूक जाहीर होऊन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपली आहे. सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनलच्या विरोधात डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनल व अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनलच्या वतीने सर्वच्या सर्व उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे दोन माजी अध्यक्ष मोहितेंच्या एकत्रीकरणाचे काय झाले? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांची झालेली बैठक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना आघाडीचे दिलेले संकेत महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे जरी दोन्ही मोहितेंनी स्वतंत्र पॅनलमार्फत अर्ज भरले असले तरी एकत्रीकरणाची आशा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कायम आहे.

कोट

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उदय पाटील यांच्या उपस्थितीत तालुक्यातील प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी झाली. या बैठकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी कृष्णा कारखाना निवडणुकीसंदर्भात डॉ. इंद्रजीत मोहिते व अविनाश मोहिते यांच्याबरोबर झालेल्या चर्चा; एकत्रित झालेल्या बैठका यांची सगळी माहिती आम्हा कार्यकर्त्यांना दिली. येत्या दोन दिवसांत आघाडीची घोषणा होईल, असेही त्यांनी आम्हाला सांगितले आहे.

मनोहर शिंदे,

तालुकाध्यक्ष, कराड तालुका काँग्रेस (दक्षिण)

चौकट

अजून बराच अवधी हातात

एका बाजूला डॉ. इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते यांच्या एकत्रीकरणाच्या बैठका सुरू होत्या, तर दुसरीकडे या दोघांनी आपापल्या पॅनलच्या वतीने संभाव्य सर्व उमेदवारांचे अर्ज भरले आहेत; पण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकच पॅनल करून लढायचं म्हटलं तर १७ जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे एकत्रीकरणासाठी अजून बराच अवधी हातात आहे, असे निकटवर्तीय सांगतात.

Web Title: Prithviraj's lead signals in party workers' meeting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.