वाई- पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात खाजगी बस पेटली; सुदैवाने जीवितहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2022 07:52 PM2022-02-20T19:52:27+5:302022-02-20T19:52:42+5:30
दुपारी तीनची घटना
वाई :- पसरणी घाटात नागेवाडी फाट्याजवळ दुपारी तीनच्या सुमारास एका खाजगी बसने पेट घेतला, या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु प्रवाशांच्या साहित्यासह संपूर्ण बस जाळून खाक झाली, रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पसरणी घाटात वाहतूक मोठ्या प्रमाणात होती.
माणगांव (गोरेगांव) येथील खाजगी कंपनी मधील कर्मचाऱ्यांची सहल सपकाळ ट्रॅव्हल्सच्या बस ( एम एच -०६ एस ९३५४) ने पंढरपूरला गेली होती, तेथून रविवारी सकाळी मांढरदेव मार्गे महाबळेश्वरला निघाले असता, दुपारी तीनच्या सुमारास पसरणी घाटात बस आली त्यावेळी शेजारून जाणाऱ्या वाहन चालकाने बसमधून धूर येत असल्याचे चालकास सांगून सतर्क केले. चालक रवींद्र कोळसकर वय ४७ वर्षे रा.माणगांव यांनी प्रसंगावधान ओळखून बस रस्त्याच्या कडेला उभी करून गाडीतील सर्व प्रवाशी खाली उतरविले, त्यामुळे पुढील अनर्थ टाळला.
या बसमध्ये लहान मुलांसह ३९ प्रवाशी होते, या घटनेची माहिती मिळताच वाई व पांचगणी पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी दाखल झाले, त्यांनी घटनेची गांभीर्य ओळखून वाई-पाचगणी अग्निशमन बंबाला पाचारण केले, वाई पालिकेच्या अग्निशमन बंबाने आग विझविण्याचे प्रयन्त केला परंतु संपूर्ण बस जाळून खाक झाली, दरम्यान या घटनेमुळे वाई पाचगणी रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती, बस विझविल्या नंतर पोलीसांनी वाहतूक सुरळीत केली.