शिवशाही बससह चालकही खासगी कंपनीचा; प्रवासी एसटीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:26 PM2018-03-13T23:26:30+5:302018-03-13T23:26:30+5:30
जगदीश कोष्टी ।
सातारा : राज्य परिवहन महामंडळाने ताफ्यात दाखल केलेल्या शिवशाही गाड्या त्यांच्या नाहीतच. गाडी, चालक खासगी कंपनीचा असताना ते बसस्थानकात घुसून प्रवाशांना घेऊन जात आहेत. पारंपरिक लालपरिच्या चालकांवर मात्र कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे. टप्प्याटप्प्याने चार विभागांचे यापूर्वीच खासगीकरण झाले होते. त्यामुळे धोकादायक भविष्याची नांदी समजली जात आहे.
राज्यातील खेडोपाड्यांमध्ये एसटीचं जाळं विणलं आहे. अनेकदा नफातोट्याचा विचार न करता एसटीनं फेºया केल्या आहेत. समाजातील अनेक घटकांना एसटीनं प्रवासात सवलती दिल्या. गेली ६४ वर्षे प्रवाशांच्या सेवेसाठी अविरत धावत असलेल्या एसटीबद्दल प्रवाशांना जेवढे प्रेम आहे. तेवढेच लाखो कुटुंबीयांच्या संसाराचा गाडा एसटी हाकत असल्याने कर्मचारीही जीव तोडून मेहनत करत आहेत.
एसटीच्या उत्पन्नाच्या मुद्यावरून खासगीकरणाचा विषय नेहमीच गाजत आहे. त्याला विरोधही होत आहे. त्यामुळे महामंडळातील अनेक विभागांचे टप्प्याटप्प्याने खासगीकरण करण्याचा घाट घातला गेला. या विभागांचे खासगीकरण केल्यामुळे कर्मचाºयांवर फारसा परिणाम न झाल्याने विरोध झाला नाही. झळ बसत होती; पण जाणवत नव्हती.
एसटीच्या प्रत्येक गावात नियमित फेºया होतात. महत्त्वाचे कागदपत्रे, एखादी वस्तू एखाद्या गावाला पाठवायची असेल तर चालक, वाहकांकडे दिली जात होती. हे कर्मचारीही न विसरता वस्तू संबंधित व्यक्तीला देत.
दहा ते पंधरा वर्षांपूर्वी सर्वप्रथम पार्सल विभागाचे खासगीकरण केले. त्यानंतर कोणत्याही वस्तू परस्पर घेऊन जाण्यावर चालक-वाहकांवर निर्बंध आले. ज्या वस्तूप्रसंगी मोफत पोहोचत होत्या, त्यासाठी पैसे मोजण्याची वेळ आली. आता हा विभाग एसटीनं पुन्हा स्वत:कडे घेतला आहे.
प्रत्येक बसस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. त्यांसाठी पूर्वी मोफत स्वच्छतागृहाची सोय होती. अनेक बसस्थानकात बांधा, वापरा, हस्तांतरित करा तत्वावर स्वच्छतागृहाचा ठेका खासगी कंपनीला दिला. ठेका देताना काही अटी घातलेल्या असतात. त्यामध्ये महिलांसाठी कसलेही शुल्क आकारता येणार नाही. तसे फलक लावलेले असले तरी तेथे बसणारे राजरोसपणे पैसे वसूल करतात. काही ठिकाणी तर पैसे न दिल्यास आतही सोडले जात नाही.
एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने लोक येतात म्हटल्यावर व्यावसायिकांसाठी नामी संधी असते; पण एसटीनं जाहिरातीचाच ठेका देऊन टाकला. जागा, इमारत, वाहन एसटीचे; पण त्यावर जाहिराती घेण्याचा अधिकारही एसटीला नाही.
लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून एसटीत वाय-फाय सुरू केले आहे. ही सुविधाही खासगी कंपनीकडून दिली जाते. या विभागांचे खासगीकरण झाल्याने प्रवाशांच्या खिशाला भलेही झळ पोहोचत नसले तरी या निमित्ताने खासगी कंपन्यांचा शिरकाव होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर इतरही संपूर्ण विभागाच्या खासगीकरणास उशीर लागणार नाही.
गाड्या धुण्यासाठीही बाहेरची पोरं
महामंडळाच्या प्रत्येक आगारात सर्व्हिसिंग केले जाते. तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी तज्ज्ञ कर्मचारी कष्ट करतात; पण अनेक आगारांमध्ये गाड्या धुण्यासाठी बाहेरची मुलं नेमली आहेत.
महामंडळाचा लोगो अन् नावाचा वापर कशाला
शिवशाही गाड्या बनविण्यासाठी खासगी कंपनीला ठेका द्यायला हरकत नव्हती; पण चालकही त्याच कंपनीचे आहेत. सेवा दिल्याबद्दल एसटी या कंपनीला मोबदला देणार आहे. एसटीतही उच्चशिक्षित चालक आहेत.
गाड्या चालविण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले असते, मोठ्या गाड्या चालविण्याचे परवाने काढून दिले असते तर खासगी चालक ठेवण्याची गरजच भासली नसती. तसेच प्रवाशांची सुरक्षाही अबाधित राहू शकते. खासगी वाहनावर बोधचिन्ह व एसटीचे नाव कशासाठी असा प्रश्न चालकांमधून विचारला जात आहे.