Satara News: कंटेनरला पाठिमागून खासगी लक्झरी बसची धडक; एकजण ठार, चौघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 11:37 AM2023-07-01T11:37:15+5:302023-07-01T11:37:30+5:30
मुराद पटेल शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ ता. खंडाळा गावच्या हद्दीत कंटेनरला पाठिमागून भरधाव खासगी लक्झरी बसने जोरदार ...
मुराद पटेल
शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ ता. खंडाळा गावच्या हद्दीत कंटेनरला पाठिमागून भरधाव खासगी लक्झरी बसने जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील एक प्रवाशी युवक जागीच ठार झाला. तर बस व्यवस्थापकासह चार जण गंभीर जखमी झाले. आज, शनिवार (दि.०१) मध्यराञीच्या सुमारास हा अपघात घडला.
सुरज भिमराव शेवाळे (वय २७, रा.टाळगाव शेवाळेवाडी ता.कराड) असे मृताचे नाव आहे. हा भीषण अपघात एका कंपनीच्या सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.
घटनास्थळावरुन व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबईहून-सांगली जिल्ह्यातील चांदोली याठिकाणी ज्योर्तीलिंग कृपा ही खासगी ट्रँव्हल्स लक्झरी बस (क्रं.एमएच-०१-डीआर-०१०८) निघाली होती. बसमध्ये ४३ प्रवाशी प्रवास करीत होते .दरम्यान, बस सातारा जिल्ह्यातील शिरवळ गावच्या हद्दीत महामार्गावर एका हाँटेलसमोर आली असता एक मालट्रक वळण घेत असताना कंटेनर (क्रं.एनएल-०१-जी-४०६९) ला पाठिमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला.
यात आपल्या पत्नीसमवेत प्रवास करीत असलेले सुरज शेवाळे हे जागीच ठार झाले. तर, बसमधील व्यवस्थापक अकुंश बापूसो पाटील (वय ४२, रा. पणुंबरे जि. सांगली), प्रवाशी राजश्री अनिल मोरे (२९,रा,कराड), शंकर आनंदा बगाडे(४५, रा.बत्तीस शिराळा जि.सांगली), अमित महादेव पवार(२९, रा. किंद्रेवाडी जि.सांगली) हे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलीस अंमलदार तुषार कुंभार, सुजित मेंगवडे व शिरवळ रेस्क्यू टिमचे सदस्य तसेच १०८ रुग्णवाहिका तत्काळ दाखल झाले. जखमींना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचार सुरु आहेत. सुरज शेवाळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. चालक केरबा सवणे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला अपघाताची फिर्याद दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार हे करीत आहेत.