खासगी सावकारी फोफावतेय
By admin | Published: November 20, 2014 09:42 PM2014-11-20T21:42:28+5:302014-11-21T00:28:57+5:30
वडूजमध्ये तक्रारीनंतर छापे : इतरांबाबत प्रशासनाची गांधारीची भूमिका
वडूज : दुष्काळी तालुक्यात खासगी सावकारीचे जाळे निर्माण झाले असून, अधिकृत कमी मात्र अनधिकृत सावकारांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. याबाबत कायदा कडक असला तरी अशा सावकारांना शोधून त्यांच्यावर कारवाई करणे प्रशासनाला मोठे आव्हान ठरत आहे.
बुधवार, दि. १९ रोजी वडूज येथील गोकुळ ज्वेलर्स व दक्ष ज्वेलर्ससह चार ठिकाणी खासगी सावकारीप्रकरणी छापा टाकला असता काही आक्षेपार्ह कागदपत्रे व नोंदवह्या जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती सहायक निबंधक प्रीती काळे यांनी दिली. गोकुळ ज्वेलर्सचे मालक विनोद पवार व दक्ष ज्वेलर्सचे मालक देविदास बागल हे खासगी सावकारी करत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली होती.
त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा उपनिबंधकांना कारवाईचे आदेश देण्यात आले होते. बुधवार, दि. १९ रोजी सहायक निबंधक प्रीती काळे यांनी पवार व बागल यांच्या ज्वेलर्स व घरावर चार पथकांद्वारे छापे टाकले. या छाप्यात आक्षेपार्ह दस्ताऐवज, नोंदवह्या आढळून आल्या असून, ही कागदपत्रे जप्त करण्यात आली. संबंधित कागदपत्रे तपासणीसाठी जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविण्यात आली आहेत.
या कारवाईने खासगी सावकारांचे धाबे दणाणले असून याबाबत तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
वाड्या-वस्त्यांपर्यंत साखळी
सध्या खटाव तालुक्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच सावकारांकडे सावकारीचा अधिकृत परवाना असून, परवाना नूतनीकरणासाठी किंवा रद्द करण्याबाबत काही जणांना सहायक निबंधक कार्यालयातून दि. २० सप्टेंबर रोजी नोटिसा बजविण्यास आल्याची माहिती कार्यालयातून देण्यात आली.
ाालुक्यात परवानाधारक सावकारांची संख्या कमी
असली तरी खरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. विनापरवाना खासगी सावकारांची साखळी गाव तसेच वाड्या-वस्त्यांवर कार्यरत असून, आजअखेर कोणतीच तक्रार दाखल नसल्याने हा व्यवसाय फोफावत आहे.