Satara: लाच प्रकरणातील खासगी इसम निघाला मुंबईचा फौजदार, न्यायाधीश धनंजय निकम यांच्या घरातही तपासणी
By नितीन काळेल | Updated: December 14, 2024 19:22 IST2024-12-14T19:21:48+5:302024-12-14T19:22:47+5:30
सातारा : जामीन मंजूर करून देण्यासाठी पाच लाखांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह ...

Satara: लाच प्रकरणातील खासगी इसम निघाला मुंबईचा फौजदार, न्यायाधीश धनंजय निकम यांच्या घरातही तपासणी
सातारा : जामीन मंजूर करून देण्यासाठी पाच लाखांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे. त्यामधील खासगी इसम किशोर खरात हे मुंबईत सहायक फाैजदार असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच न्यायाधीश निकम यांच्या घरातही तपासणी करण्यात आली, अशी माहिती पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने देण्यात आली.
पुणे येथील एका महिलेच्या वडिलांना सातारा शहर पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटक झाली आहे. तसेच त्यांनी सातारा जिल्हा न्यायालयात जामिनीसाठी अर्ज केला होता. हा जामीन अर्ज मंजूर करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच ती रक्कम मिळविण्याचा प्रयत्नही झाला. त्यामुळे याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी, मुंबई), सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. तीन धनंजय लक्ष्मणराव निकम आणि अनोळखी एकजण अशा चाैघांच्याविरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. तर याप्रकरणी न्यायाधीश निकम यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्जही केला होता. पण, तो फेटाळला आहे.
या प्रकरणाचा तपास पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे. या विभागाच्या तपासणीत सुरुवातीला किशोर खरात हे खासगी इसम होते, असे समोर आलेले. पण, तपासादरम्यान खरात हे मुंबईतील वरळी येथे सहायक फाैजदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेण्यात येत आहे. तर न्यायाधीश धनंजय निकम यांच्या साताऱ्यातील घरातही विभागाने पाहणी केली. पण, तेथे काही आक्षेपार्ह आढळले नाही, अशी माहितीही पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.