खासगी शाळांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला कोलदांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:49 AM2021-06-16T04:49:49+5:302021-06-16T04:49:49+5:30

सातारा : नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून, अजूनही खासगी शाळांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे फीचा ब्रेक अप दिला नाही. ...

Private schools clashed with the Collector's order | खासगी शाळांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला कोलदांडा

खासगी शाळांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला कोलदांडा

Next

सातारा : नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून, अजूनही खासगी शाळांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे फीचा ब्रेक अप दिला नाही. उलट शाळा प्रशासन पालकांवर दबाव आणत नवीन वर्षाची फी भरा म्हणून तगादा लावत असल्याचा आरोप जिल्हा पालक संघाने पत्रकाद्वारे केला आहे.

या पार्श्वभूमीवर पालक संघ आता आक्रमक झाला असून, शाळांचे हीत जपताना, शाळेकडून निर्णय देणाऱ्या पीटीए मेंबर्सची चौकशी करून त्यांच्यावर इतर पालकांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांच्याकडे संघाने केली आहे. खासगी शाळांच्या मनमानीला आणि पालकांच्या संघटनेला कीड लावणाऱ्या पीटीए मेंबर्सविरुद्ध पालक संघ आता कायदेशीर संघर्ष करीत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत २७ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्व खासगी शाळांनी फीचा ब्रेकअप लिखित स्वरूपात अथवा इ-मेल स्वरूपात शिक्षणाधिकारी यांना द्यावा, असा आदेश असताना, खासगी शाळा यांनी त्याला उत्तर दिले नाहीच; पण फी वसुली मात्र जोमात सुरू ठेवली आहे. ८ जूनला पालक संघाने शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन पुन्हा एकदा शाळांनी फीचा ब्रेकअप द्यावा, असे स्मरणपत्र काढण्यासाठी विनंती केली. त्या पत्राची मुदत संपली, तरी खासगी शाळांनी फीचा ब्रेकअप दिला नाही.

खासगी शाळा जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. खासदार उदयनराजे यांनीसुद्धा ‘सेवा तेवढी फी’ या पालक संघाच्या मुख्य मागणीला पाठिंबा दिला. केवळ फीसाठी मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, असेही शाळांना सांगितले; पण शाळा ऐकायला तयार नाहीत.

- प्रशांत मोदी, जिल्हा पालक संघ, सातारा

चौकट

शाळाधार्जिण्या पीटीए मेंबर्सवर फसवणुकीचा गुन्हा

पालक संघ ‘जेवढी सेवा तेवढीच फी’ या मागणीवर ठाम आहे. जे पीटीए मेंबर्स शाळांचे हित पाहत आहेत, त्यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत, अशा पीटीए मेंबरची चौकशी करून दोषी आढळलेल्या पीटीए मेंबर्सवर पालकांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. शाळांचे हीत पाहणारे पीटीए मेंबर्स ही पालकांच्या संघटनेला लागलेली कीड असून, अशा पीटीए मेंबर्संना धडा शिकविण्यासाठी पालक संघाने कंबर कसली असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Private schools clashed with the Collector's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.