Satara News: कऱ्हाडात बेशिस्त चालकांमुळे कोंडी! शाहू चौक गुदमरला, वाहनांच्या लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 12:52 PM2023-02-08T12:52:56+5:302023-02-08T12:53:07+5:30

चालकांच्या आडमुठेपणामुळे मोठ्या प्रमाणावर कोंडी

Problem of traffic jam in Karad city due to reckless drivers | Satara News: कऱ्हाडात बेशिस्त चालकांमुळे कोंडी! शाहू चौक गुदमरला, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Satara News: कऱ्हाडात बेशिस्त चालकांमुळे कोंडी! शाहू चौक गुदमरला, वाहनांच्या लांबच लांब रांगा

googlenewsNext

कऱ्हाड : बेशिस्त चालकांमुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. सोमवारी दुपारीही शाहू चौकात काही चालकांच्या आडमुठेपणामुळे मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ही कोंडी फोडण्यासाठी सुमारे अर्ध्या तासाने पोलिस दाखल झाले. मात्र, तोपर्यंत प्रवाशांसह चालकांनाही मनस्ताप सहन करावा लागला.

शहरातील रस्ते प्रशस्त झाले आहेत. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोपटभाई पेट्रोल पंप चौक, भेदा चौक, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, विजय दिवस चौक, उपजिल्हा रुग्णालय चौक तसेच कृष्णा कॅनॉल याठिकाणी सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी अद्यापही वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

काही महिन्यांपूर्वी शहरातील कृष्णा नाका ते कृष्णा कॅनॉल यादरम्यानच्या पुलावर कोंडी निर्माण होत होती. मात्र, दुसऱ्या पुलावरुन वाहतूक सुरू झाल्यामुळे तेथील कोंडीचा प्रश्न निकालात निघाला. इतर कोणत्याही रस्त्यावर कोंडी होण्यासारखी परिस्थिती नाही. मात्र, तरीही शहरातील शाहू चौकात चालकांच्या बेशिस्तपणामुळे अनेकवेळा वाहतुकीचा खोळंबा होतो.

कोल्हापूर नाक्यावरुन शहरात येणारी वाहने शाहू चौकमार्गे दत्त चौकाकडे जातात. तर दत्त चौकातून शहराबाहेर जाणारी काही वाहने एकेरी मार्गावरुन पंचायत समितीसमोरुन शाहू चौकमार्गे कोल्हापूर नाक्याकडे तर काही वाहने जुन्या ब्रिटिशकालीन पुलाकडे जातात. जुन्या पुलाकडे जाणाऱ्या वाहनांना कोल्हापूर नाका ते दत्त चौकाकडे जाणारा रस्ता ओलांडावा लागतो.

त्यातच एकाचवेळी वाहने समोरासमोर आली तर निघून जाण्याच्या गडबडीत ही वाहने एकमेकांसमोर उभी ठाकली जातात. परिणामी, चारही दिशांची वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. सोमवारीही असाच प्रकार घडल्यामुळे मोठी कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या. त्यातून वाट काढताना पादचाऱ्यांनाही कसरत करावी लागली.

जुन्या पुलावरही प्रश्न गंभीर

ब्रिटिशकालीन जुन्या पुलावरुन चारचाकी हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावरही वाहतुकीचा ताण वाढला असून पुलाच्या सुरुवातीलाच दूरध्वनी केंद्रानजीक वाहतुकीची कोंडी होत आहे. अरुंद रस्ता, अतिक्रमण तसेच पार्क केलेली वाहने यामुळे ही परिस्थिती निर्माण होत असून शाहू चौक व जुन्या पुलाच्या परिसरात वाहतूक पोलिसांची नेमणूक करणे गरजेचे आहे.

Web Title: Problem of traffic jam in Karad city due to reckless drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.