खंडाळ्यात ‘ब्रेक द चेन’ ला भाजी मंडईची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:40 AM2021-04-16T04:40:42+5:302021-04-16T04:40:42+5:30
खंडाळा : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा करून ‘ब्रेक द चेन’ साठी ...
खंडाळा : कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा करून ‘ब्रेक द चेन’ साठी नागरिकांना आवाहन केले आहे. खंडाळा शहरात मात्र दैनंदिन मंडई नेहमीच्याच पद्धतीने भरली गेल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांनी भाजी विक्रेते व व्यावसायिकांची तातडीने बैठक घेऊन नियमांचे पालन करून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या .
खंडाळा शहरात भाजी मंडईसाठी स्वतंत्र जागा नसल्याने मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी भाजी विक्रेते बसत असतात. आळा घालण्यासाठी ‘ब्रेक द चेन’चे आवाहन करून लॉकडाऊनची नवी नियमावली जाहीर केली आहे. सध्या ३२ रुग्ण उपचारार्थ दवाखान्यात आहेत. त्याचा आणखी प्रसार होऊ नये यासाठी खंडाळा नगरपंचायत दक्षता घेत आहे. शहरातील व्यवहार शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार सुरू असले तरी भाजी मंडईत होणारी गर्दी रोखणे गरजेचे आहे. वास्तविक त्यासाठी ज्यांना शक्य आहे. त्या विक्रेत्यांनी घरोघरी फिरून भाजी विक्री करणे गरजेचे आहे.
शहरात कोरोनाचा प्रभाव वाढू नये यासाठी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांनी विक्रेत्यांची बैठक घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, स्टॉलवर गर्दी होऊ न देणे, मास्क नसलेल्या ग्राहकांना भाजी न देणे याशिवाय विक्रेत्यांनी स्वतःची कोरोना तपासणी करून काळजी घेणे याबाबतच्या सूचना केल्या अन्यथा नियमांचे पालन न झाल्यास भाजी विक्री बंद करावी लागेल, असेही सूचित केले. यावेळी नियमांचे पालन करण्याची ग्वाही विक्रेत्यांनी दिली. त्यामुळे भाजी मंडईला शिस्त लागण्याची शक्यता आहे
फोटो : खंडाळा शहरात रस्त्यावरच मंडई भरल्याने गर्दी होत असल्याचे दिसून येते.