मलकापुरात सांडपाण्यावर होणार प्रक्रिया
By admin | Published: May 2, 2016 11:02 PM2016-05-02T23:02:17+5:302016-05-03T00:52:54+5:30
पहिला टप्पा दहा जूनला सुरू : सभेत एकमुखी ठराव; विविध विषयांवर सकारात्मक चर्चा --मलकापूर नगरपंचायत विशेष सभा
मलकापूर : येथील नगरपंचायतीच्या सभेत २ कोटींच्या विकासकामांबरोबरच ४२ कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. टप्पा १० जूनला सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव एकमुखाने घेण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा कल्पना रैनाक होत्या. सभेचे विषयवाचन उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले. मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. पहिल्यांदाच नगरपंचायत सभागृह सोडून माळीनगर येथील सांडपाणी प्रक्रिया योजनेच्या एसटीपी जवळ उघड्यावरील मंडपात सभेचे आयोजन करण्यात आले होते. विषय पत्रिकेवरील ३ विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विषय क्रमांक एक हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे हा होता. २ मे रोजी या दाव्याची तारीख असून, त्यावेळी मलकापूर शहराने सांडपाणी कोयनानदीत मिसळल्यावर काय उपाययोजना केली हे सादर करावे लागणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले. जलअभियंता यू.पी. बागडे यांनी सांडपाणी प्रक्रिया योजनेच्या कामाबाबत माहिती दिली. योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. केवळ शेवटची मेन पाईपलाईन टाकणे बाकी आहे. शेतकऱ्यांबरोबर चर्चा झाली आहे. उर्वरित टप्प्याचे काम २४ तास काम करून १० जूनला हा पहिला टप्पा सुरू होईल. त्यानंतर मलकापूरचे सांडपाणी कोयना नदीत जाणार नाही. पाईपलाईनचे काम अपुरे राहिले तरी नदीकडे जाणारे दोन ओढे आडवून ते पाणी एसटीपीमध्ये शुद्ध करून पुढे सोडले जाणार आहे, अशी माहिती दिल्यानंतर हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व नगरसेवक सहकार्य करतील, असा विश्वास देण्यात आला.
१४ व्या वित्त आयोगातून १ कोटी ९० लाखांच्या निधीतून ८० टक्के म्हणजेच १ कोटी ५४ लाखांत घनकचरा प्रकल्पाच्याही पहिल्या टप्प्याचे काम करण्याचा ठराव करण्यात आला. उर्वरित ३६ लाखांत पाणीपुरवठा टाक्यांची सुरक्षितता, प्रलंबित कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार...
सांडपाणी प्रक्रिया योजनेच्या पहिल्या टप्प्यातील शेवटच्या मेन पाईपलाईनचे काम आगाशिवनगर परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीतून करावे लागणार आहे. हे काम करताना ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होणार आहे. त्यांच्या पिकांचे तज्ज्ञांकडून मूल्यमापन करून नुकसान भरपाई देण्याचा ठराव करण्यात आला.
९ महिन्यांत
८० टक्के काम
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ४२ कोटींची सांडपाणी प्रक्रिया योजना सत्यात उतरवणारी राज्यातील पहिलीच नगरपंचायत आहे. १९ आॅगस्ट २०१५ रोजी योजनेच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. केवळ ९ महिन्यांतच योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, जून महिन्यात पहिला टप्पा कार्यान्वित होणार आहे.
प्रभागनिहाय
सभा घ्या...
नगरपंचायत स्थापनेनंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उघड्यावर सभा घेण्यात आली. अशा पद्धतीने सर्वसाधारण सभा या प्रभागनिहाय घ्याव्यात, अशी सूचना महिला नगरसेविकांनी मांडली.