‘सर्जा-राजा’संगे ट्रॅक्टरचीही काढली मिरवणूक
By admin | Published: July 29, 2015 09:52 PM2015-07-29T21:52:11+5:302015-07-29T21:52:11+5:30
जिल्ह्यात बेंदूर जल्लोषात : सजविलेल्या बैलांच्या धूमधडाक्यात मिरवणुका; डॉल्बी, बॅन्ड, लेझिम पथकांचा सहभाग
सातारा : शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतीत राबणाऱ्या बैलांना सजवून त्यांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्याचा दिवस म्हणजे बेंदूर. बैलांच्या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बेंदूर. यानिमित्त आज (बुधवार) जिल्हाभरात गावोगावी बैलांची जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे नागठाणे, ता. सातारा येथे चक्क ट्रॅक्टरचीही मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक अन् आधुनिक काळाचा हा अनोखा मिलाप यंदा पाहायला मिळाला. शेतकऱ्यांच्या दारात आता बैलांऐवजी ट्रॅक्टर उभे असलेले पाहायला मिळतात. शेतकरी आधुनिक बनल्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे.
वाईत डॉल्बीचा दणका अन् फटाक्यांची आतषबाजी
वाई : वाई तालुक्यात पारंपरिक पद्धतीने बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आला. काही ठिकाणी डॉल्बीच्या तालावर वाजतगाजत मिरवणुका निघाल्या तर काही गावांमध्ये ढोल-ताशा, लेझिम पथक अशा पारंपरिक पद्धतीने बैलांच्या गावातून मिरवणुका काढल्या. तसेच घरोघरी पूजा करून बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.
मल्हारपेठ परिसरात बेंदूर सणाची परंपरा कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी बैलांची धामधुमीत मिरवणूक काढून सण साजरा केला. खंडाळा तालुक्यात सर्जा-राजाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
बैलांच्या शिंगांना बेगड, फुगे लावले होते. तर पाठीवर रेशमी झूल टाकली होती. ग्रामदैवताचे दर्शन घेऊन मिरवणुका निघाल्या. त्यानंतर चिमुरड्यांनी बैलांभोवती गोल फेऱ्या मारत ‘चावार चावार चांगभलं, पाऊस आला चांगभलं... असा घोष करीत सण साजरा केला.
बैल रंगविण्याचा
हटके प्रयोग
किडगाव : बेंदराला शेतकरी आपल्या बैलांना इतरांपेक्षा हटके पद्धतीने सजविण्याचा प्रयत्न करत असतो. किडगाव, ता. सातारा येथील काही शेतकऱ्यांनी बैलांना रंग देण्यासाठी चक्क स्प्रे पंपाचा वापर केला. शेती पिकविण्यासाठी बळीराजानं बैलाच्या पाठीवर येरे येरे पावसा... असा संदेश लिहून वरुणराजाला हाक दिली आहे.
किडगाव, नेले, धावडशी, कळंबे, माळेवाडी, कण्हेर, कोंडवे परिसरात उत्साहात बेंदर साजरा करण्यात आला.
महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड, अवकाळे, वाडा कुंभरोशी, मेटतळे, टेकवली, भेकवली, मांघर, पारूट या ठिकाणीही बेंदूर सण साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)
रंगलेल्या पाठीवर नक्षीदार झूल
सणानिमित्त बळीराजाने भल्या सकाळी बैलांना गरम पाण्याने अंघोळ घातल्यानंतर सजविण्याचे काम सुरू झाले. सहकुटुंब बैलांना सजविण्यासाठी हातभार लावत होते. कुणी पाठीला रंग देत होते, तर महिला, चिमुरडी नक्षीकाम करत होते. रंगविलेल्या पाठीवर नक्षीदार झूल टाकून बैलांची मिरवणूक काढण्यात आली.
शेतीलाही नैवेद्य अन् वृक्षारोपण
बेंदरादिवशी आंब्याच्या पानांचे तोरण घराच्या चौकटीला बांधले जाते. तसेच शेतात जाऊन काळ्या आईची पूजा करून नैवेद्य दाखविला जातो. झाडांची लागवडही केली जाते.
भुर्इंजमध्ये मिरवणुकीतून कलाम यांना श्रद्धांजली
भुर्इंज : बेंदूर सणानिमित्त येथील शेतकऱ्यांनी काढलेल्या मिरवणुकीत भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांना श्रध्दांजली अर्पण केल्याने उत्साहाचा हा बेंदूर सण काहीसा हळवा झाला.
येथील किसन वीर कारखान्याचे आर्किटेक्चर अमोल भोसले यांनी कलाम यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर बेंदूर सण साजरा करायचा की नाही याबाबत साऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी मुक्या जनावरांनाचा हा सण वर्षातून एकदाच येत असून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच डॉ. कलाम यांनाही श्रध्दांजली अर्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला. भोसले यांनी बैलांच्या पाठीवर कलाम यांची प्रतिकृती रेखाटून त्यांना अर्पण केलेली श्रध्दांजली संपूर्ण गावात चर्चेचा विषय ठरली.