विसर्जनादिवशी मिरवणूक काढू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:47 AM2021-09-09T04:47:25+5:302021-09-09T04:47:25+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत नसल्याने यंदाही गणेशोत्सव शासनाने दिलेल्या अटी-शर्थींसह साधेपणाने साजरा करावा. जिल्ह्यात जमावबंदीचे ...
सातारा : जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत नसल्याने यंदाही गणेशोत्सव शासनाने दिलेल्या अटी-शर्थींसह साधेपणाने साजरा करावा. जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असून, डॉल्बीला परवानगी नसून, स्थापनेदिवशी व विसर्जनादिवशी मिरवणुका काढू नयेत, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी केले.
पोलीस करणमूक केंद्रात झालेल्या शांतता कमिटीमध्ये ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, नगराध्यक्षा माधवी कदम तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे म्हणाले, कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव असल्याने सातारा जिल्हा हॉटस्पॉटमध्ये आहे. यामुळे कोरोनाचा धोका कायम असल्याने सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवावे. मास्क वापरावा. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक उपक्रम राबवून हा सण साजरा करावा,
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले, लाऊडस्पीकरला ठराविक वेळेत परवानगी असून, त्याच्या आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. गणेशोत्सव जसा धार्मिक, आध्यात्मिक आहे तसाच सामाजिक हित जपण्याचा सण आहे. गणेश मंडळांवरच आता अधिक जबाबदारी असून, सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
नगराध्यक्षा माधवी कदम म्हणाल्या, सातारा पालिकेच्यावतीने कृत्रिम तळी तसेच ठिकठिकाणी कुंड उभारण्यासह प्राथमिक सुविधा देणार असल्याची ग्वाही दिली. दरम्यान, सुरुवातीला नागरिकांना अडचणी मांडण्याचे सांगण्यात आल्यानंतर यावेळी नगरसेवक अविनाश कदम, धनंजय जांभळे, अशोक मोने, नरेंद्र पाटील, प्रकाश गवळी, आशा पंडित, श्रीकांत आंबेकर, राहुल शिवनामे, सुनीशा शहा यांनी गणेशोत्सवासंबंधी मते मांडली.