जकातवाडीत जवानाची घोड्यावरून मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 09:23 PM2019-02-02T21:23:43+5:302019-02-02T21:24:20+5:30
देशाच्या सीमेवर अहोरात्र उभे राहून नागरिकांचे रक्षण करणाऱ्या जवानाचा अनोखा सत्कार सोहळा जकातवाडी (ता. सातारा) येथे शुक्रवारी पार पडला. सेवानिवृत्त जवान गणेश बबन चव्हाण (३८) यांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात
सातारा : देशाच्या सीमेवर अहोरात्र उभे राहून नागरिकांचे रक्षण करणाऱ्या जवानाचा अनोखा सत्कार सोहळा जकातवाडी (ता. सातारा) येथे शुक्रवारी पार पडला. सेवानिवृत्त जवान गणेश बबन चव्हाण (३८) यांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. तसेच महिलांनी औक्षण केल्यानंतर त्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कारही करण्यात आला.
जकातवाडी ग्रामपंचायत नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असते. ग्रामपंचायतीने नुकताच विधवा पुनर्विवाहाचा ठरावही मंजूर केला आहे. एकीकडे सामाजिक उपक्रम राबविले जात असताना सैन्यदलात कार्यरत असलेल्या गावातील जवानांसाठी आपण काहीतरी करावं, अशी कल्पना जवान गणेश चव्हाण यांच्या कुटुंबीयांच्या मनात आली. त्यांनी याबाबत ग्रामपंचायत व ग्रामस्थांशी चर्चा केली आणि देशसेवेतून निवृत्त झालेल्या जवानांचा अनोख्या पद्धतीने सत्कार करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला.
जवान गणेश चव्हाण हे सतरा वर्षांच्या सेवेनंतर १ फेब्रुवारी २०१९ रोजी निवृत्त झाले. शुक्रवारी सकाळी गावात पाऊल ठेवताच त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याला कारणही तसेच होते. ग्रामस्थांच्या वतीने गणेश चव्हाण यांची ढोल-ताशाच्या गजरात घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. गावातील महिलांकडून त्यांचे औक्षण करण्यात आले. यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कारही करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या या अनोख्या सोहळ्याचे कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सरपंच चंद्रकांत सणस, उपसरपंच हनुमंत भोसले, ग्रामपंचायत सदस्य उत्तम सणस, सखुबाई देशमुख, शंकर दळवी, विनायक हगवण, योगेश शिंदे, उत्तम भोसले, धनराज दौंडे, सचिन जाधव, राजेश भोसले, तानाजी जाधव, सुशांत माने, अमोल कांबळे, वैभव शिंदे, सतीश पवार, तुकाराम काकडे, रोहित सावंत, महेश गायकवाड, दीपक देवकर, मंगेश शिंदे, माजी सरपंच रामचंद्र शिंदे, प्रल्हाद भोसले, माजी सैनिक यशवंत सणस, रघुनाथ शिंदे यांच्यासह गणेश चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी परिश्रम घेतले.
उपक्रमाची परंपरा ग्रामपंचायत कायम ठेवणार : चंद्रकांत सणस
जकातवाडी ग्रामपंचायत नेहमीच आगळे-वेगळे उपक्रम राबवित असते. देशसेवा करणाºया जवानांच्या सन्मानार्थ प्रथमच हा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. ही परंपरा आता पुढे कायम राहणार आहे. गावातील सेवानिवृत्ती जवानांचा पुढेही असाच सत्कार केला जाईल, अशी माहिती सरपंच चंद्रकांत सणस यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
गावकºयांकडून झालेला सत्कार हा कधीही न विसरणारा आहे. यासाठी गावकºयांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. मला जो आनंद झाला तो मी शब्दात व्यक्तच करू शकत नाही. यापुढे गावातील तरुण पिढीला सैन्यदलात भरती होण्याबाबत सर्वतोपरी मार्गदर्शन करणार आहे.
- गणेश चव्हाण, सेवानिवृत्त जवान, जकातवाडी