सातारा जिल्ह्यातील मत्स्यबीज निर्मिती घटली : मागणी असूनही बीज मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:37 AM2018-10-31T00:37:23+5:302018-10-31T00:39:17+5:30
सागर गुजर । सातारा : जिल्ह्याच्या मत्स्य बीजनिर्मितीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. वर्षाकाठी सरासरी ८० लाख मत्स्य बीजनिर्मिती ...
सागर गुजर ।
सातारा : जिल्ह्याच्या मत्स्य बीजनिर्मितीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. वर्षाकाठी सरासरी ८० लाख मत्स्य बीजनिर्मिती करणाऱ्या धोम येथील प्रकल्पातून चालू वर्षी अवघी ७ ते ८ लाख बीजनिर्मिती झाली आहे. या व्यवसायाकडे वळू इच्छिणाºया तरुणांची यामुळे निराशा झाली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आमदार बाळासाहेब पाटील यांनी मत्स्य बीज उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा मांडला होता. तसेच या विभागात काम करणारा एक अधिकारी स्वत: केज चालवत असल्याने निर्माण केलेले बीज त्यांच्या केजसाठीच वापरले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या आरोपानंतर पालकमंत्री विजय शिवतारे यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले होते.
‘लोकमत’ने याबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता एक वेगळीच माहिती समोर आली. मत्स्य विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त श्रीकांत वारुंजीकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ‘धोम धरणालगत ५ एकरामध्ये मत्स्यबीज निर्मितीचा फार्म आहे. हा फार्म शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागामार्फत चालविला जातो. येथे मत्स्यबीज निर्मिती करून ते संपूर्ण जिल्ह्यात पुरविले जाते. यंदा पाण्याअभावी बीजनिर्मिती घटली. धोम इरिगेशनकडूनही पाणी उपलब्ध झाले नसल्याने पाण्याअभावी बीजनिर्मिती कमी झाली आहे.
मंजूर निधीची प्रतीक्षा
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून धोम येथील मत्स्य बीजनिर्मिती केंद्राच्या नूतनीकरणासाठी सव्वातीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. हा निधी अद्याप मिळालेला नाही. तो मिळाल्यास या केंद्रातून पुन्हा मोठ्या संख्येने बीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे.
जिल्ह्यातील मत्स्य बीजनिर्मितीमध्ये घट झाली असल्याने मागणीनुसार पुरवठा करणे शक्य होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आमच्या विभागातील अधिकाºयांनी कुठेही केज स्वत: चालवायला घेतलेले नाही. संबंधित अधिकाºयांवर गैरसमजातून आरोप झाले आहेत. धोमच्या फार्मची डागडुजी झाल्यास मोठ्या संख्येने बीजनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
- श्रीकांत वारुंजीकर, प्रभारी सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय