बचतगटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणास चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:30+5:302021-07-15T04:27:30+5:30
कुडाळ : बदलत्या काळानुरूप महिलांना विविध क्षेत्रांत संधी मिळत आहे. त्यांनी काळाच्या ओघात स्वतःमध्ये बदल करून स्वयंरोजगाराची निर्मिती साधली ...
कुडाळ : बदलत्या काळानुरूप महिलांना विविध क्षेत्रांत संधी मिळत आहे. त्यांनी काळाच्या ओघात स्वतःमध्ये बदल करून स्वयंरोजगाराची निर्मिती साधली आहे. ग्रामीण भागात बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण होत आहे. परिवर्तन महिला बचत गटाच्या माध्यमातून सरताळे गावात सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान सुरू झाले असून यामुळे ग्रामस्थांची सोय झाली आहे, असे प्रतिपादन सार्थक फेडरेशनच्या अध्यक्षा वैशाली शिंदे यांनी केले.
सरताळे, ता. जावळी येथील परिवर्तन बचत गटाच्या माध्यमातून सुरू केलेल्या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी जावळी पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, पंचायत समिती सदस्य अरुणाताई शिर्के,जावळीचे तहसीलदार राजेंद्र पोळ, राष्ट्रवादीच्या जिल्हा महिलाध्यक्ष समिंद्रा जाधव, जिल्हा सरचिटणीस सुजाता बावडेकर, नलिनीताई जाधव, सरताळे गावच्या सरपंच सोलानी पवार, उपसरपंच सुनील धुमाळ, सदस्य निशांत नवले, माजी उपसरपंच योगेश नवले, रेशनिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भिलारे, जनार्दन नवले, मोहन नवले, सचिन नवले, पोलीसपाटील स्वाती पवार, महिला बचत गटाच्या अध्यक्ष सदस्या, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
उपसभापती सौरभ शिंदे म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासूनचा रेशनिंग दुकानासाठीचा सरताळे ग्रामस्थांचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.यामुळे ग्रामस्थांची पायपीट थांबली आहे. परिवर्तन बचत गटाच्या माध्यमातून निश्चितच पारदर्शक सेवा पुरवली जाईल. यामुळे महिला सक्षम होण्यास बळ मिळणार आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्या अरुणाताई शिर्के, तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन करण्यात आले.
रूपालीताई भिसे यांनी प्रास्ताविक केले. योगेश नवले यांनी आभार मानले.
फोटो : सरताळे, ता. जावळी येथील स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन करण्यात आले.