‘यशवंतराव चव्हाण आदर्श ग्रामसभा’ पुरस्काराने जखिणवाडीचा गौरव
By admin | Published: May 11, 2016 10:05 PM2016-05-11T22:05:56+5:302016-05-12T00:14:43+5:30
लाखाचे बक्षीस : शासनस्तरावरील १८ वा पुरस्कार
मलकापूर : राज्यसरकारने यशवंतराव चव्हाण आदर्श ग्रामसभा गौरव पुरस्कार नुकताच जाहीर केला असून सन २०१३-१४ चा पुरस्कार जखिणवाडी गावाला जाहीर झाल्यामुळे जखिणवाडी गावाने शासनाच्या अठराव्या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. शासनाचा १ लाखाचा पुरस्कार जाहीर झाल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे.
येथील जखिणवाडी गावाने आपल्या प्रगतीचा चढता क्रम व विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे सातत्य राखल्यामुळे आतापर्यंत शासनाचे १७ पुरस्कार मिळवले आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शासनाने विविध पुरस्कारांची घोषणा केली होती. त्यापैकी सन २०१३-१४ चा यशवंतराव चव्हाण आदर्श ग्रामसभा गौरव हा पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार परीक्षण करून शासनाच्या पथकाने राज्यातील विविध गावांचा अहवाल दिला होता. हे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. त्यामध्ये सन २०१३-१४ चा यशवंतराव चव्हाण आदर्श ग्रामसभा गौरव हा पुरस्कार जखिणवाडी गावाला जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण मे महिन्यात करण्याचे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. १ लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. जखिणवाडी गावाला शासनस्तरावरील हा अठरावा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे. (वार्ताहर)