प्रचारातही बांधाची रेटारेटी..!
By admin | Published: June 16, 2015 01:31 AM2015-06-16T01:31:58+5:302015-06-16T01:37:31+5:30
तिकीट वाटपात ‘दे धक्का’ : इस्लामपुरात बंधुप्रेमाला सोडचिठ्ठी..
अशोक पाटील-इस्लामपूर =-इस्लामपूर नगरपालिकेचे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी त्यांचे चुलत बंधू संजय पाटील यांना सहकार पॅनेलची उमेदवारी देऊन, त्यांच्या घरातील संजय पाटील यांचे सख्खे बंधू नगरसेवक शहाजी पाटील यांना धक्का दिला आहे. शहाजी पाटील हे संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते यांच्या प्रचारात सक्रिय असून त्यांनी बंधुप्रेमाला सोडचिठ्ठी दिली आहे. या सख्ख्या बंधूंचे कार्यकर्ते मात्र बांध रेटून प्रचारात आघाडीवर आहेत.
गत निवडणुकीत मोहिते—भोसले यांच्या मनोमीलनाविरोधात नवखे असलेले अविनाश मोहिते यांनी संस्थापक पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी अविनाश मोहिते यांना इस्लामपुरात उमेदवार मिळणे मुश्कील झाले होते. त्या कठीणप्रसंगी विजयभाऊ पाटील यांचे चुलत बंधू, जय हनुमान पतसंस्थेचे अध्यक्ष शहाजी पाटील यांनी अविनाश मोहिते यांना मोठी मदत केली.
त्यांच्याच मध्यस्थीने युवराज पाटील यांना मिळणारे तिकीट माधवराव पाटील यांना देण्यात आले. विशेष म्हणजे ते विजयीही झाले.
यावेळी मात्र शहाजी पाटील यांच्याच घरातील संजय पाटील यांनी त्यांचे मित्र जि. प. सदस्य लिंबाजी पाटील यांच्या मदतीने डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनेलमधून उमेदवारी मिळवली आहे.
हे दोघेही निवडणुकीच्या रणांगणात आहेत. संजय पाटील यांची भूमिका शहाजी पाटील यांना मान्य नाही. त्यामुळे त्यांनी संजय पाटील यांच्या बंधुप्रेमाला विरोध करीत युवराज पाटील यांच्या प्रचारालाच प्राधान्य दिले आहे.
तसेच त्यांचे बंधू, राजारामबापू कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव पाटील हे संजय पाटील यांचा प्रचार करताना दिसत आहेत. एकूणच प्रचारातही आता बांध रेटारेटीचे राजकारण सुरु आहे.
गेला माधव कुणीकडे..!
गत निवडणुकीत संस्थापक पॅनेलच्या मेहेरबानीवर निवडून आलेल्या माधवराव पाटील यांनी घरचा अहेर देत अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्याविरोधात जाऊन आवाज उठविला होता. परंतु तो आवाज दबला. यावेळच्या निवडणुकीत त्यांना अर्धचंद्र देण्यात आला आहे. इतर कोणत्याही पॅनेलने त्यांचा विचार केला नाही. त्यामुळे माधवराव पाटील अज्ञातवासात असून त्यांनी आकसापोटी संस्थापक पॅनेलविरोधात निवडणूक जाहीर निवेदन काढले आहे.
जयंतराव डिजिटलवर..!
आमदार जयंत पाटील यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. तरीसुध्दा संस्थापक पॅनेलचे उमेदवार युवराज पाटील यांनी त्यांच्या प्रचार सभेच्या डिजिटल पोस्टरवर आमदार जयंत पाटील यांचे छायाचित्र वापरले आहे. याची चर्चा चांगलीच रंगली आहे.