प्रचारतोफा आज थंडावणार

By admin | Published: February 18, 2017 11:15 PM2017-02-18T23:15:22+5:302017-02-18T23:15:45+5:30

रात्री बारापर्यंत प्रचार चालणार : ध्वनिक्षेपकाचा आवाज मात्र दहापर्यंतच

Promotions will stop today | प्रचारतोफा आज थंडावणार

प्रचारतोफा आज थंडावणार

Next

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला प्रचार शिगेला पोहोचला असून, प्रचार आज रविवार, दि. १९ रोजी मध्यरात्री बारा वाजता थांबणार असला तरी ध्वनिक्षेपकाचा आवाज मात्र रात्री दहा वाजताच बंद होणार आहे.जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम यंदा अत्यंत घाईचाच ठरला असून, अर्ज माघारी सोमवार, दि. १३ रोजी घेण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील गट अन् गणाच्या निवडणूक आखाड्यात ८२५ उमेदवार राहिले. त्यामुळे निवडणुकीत खरी रंगत आली. अर्ज मागे घेतल्यानंतर प्रचारासाठी केवळ सहाच दिवस मिळाले. त्यामुळे कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी गावोगावी सभा घेण्यावर उमेदवारांनी भर दिला. पक्षीय उमेदवारांनी नेत्यांच्या सभा घेऊन मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री दिवाकर रावते, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभा झाल्या. तसेच स्थानिक पातळीवरही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले गेले. ‘निवडणुकीच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण शंभर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ६५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. १६ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर १० लाख १२ हजार ३१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,’ अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर यांनी बैठकीमध्ये दिली. (प्रतिनिधी)

राजकीय मंडळींच्या बँक व्यवहारावर वॉच
निवडणूक प्रचार काळात सातारा जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये झालेल्या संशयास्पद व्यवहारांची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी सादर करावी. काही मोठे व्यवहार झाले असतील तर त्याबाबतही माहिती द्यावी. सर्व यंत्रणांनी दैनंदिन अहवाल मुख्यालयाला पाठवून द्यावा. उपद्रव मूल्य वाढविणाऱ्या व्यक्तींवर हद्दपारीसारखी कारवाई करा.
रात्रीची गस्त वाढवून पोलिस यंत्रणेबरोबर विविध पथकांनी कारवाई करा, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या.


जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती बैठक शनिवारी नियोजन भवनात घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी व अन्य सदस्य उपस्थित होते.


निवडणुकीबाबत सर्वांनी सतर्क राहावे. निवडणुकीची प्रक्रिया ही गांभीर्यरीत्या घ्या. त्यामध्ये निष्काळजीपणा अजिबात करू नका. बेजबाबदारपणा आढळून आल्यास राज्य निवडणूक आयोगाकडे संबंधिताबाबत अहवाल पाठविण्यात येईल, याची दक्षता घ्या, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

उमेदवारांच्या
धाब्यांची चौकशी
पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, ‘ज्या उमेदवारांची अथवा उमेदवारांशी संबंधितांचे हॉटेल, धाबे आहेत. त्यांच्याबाबत पोलिस यंत्रणांच्या माध्यमातून तपासणी करून आवश्यक कारवाई करावी. निवासी उपजिल्हाधिकारी वाघमारे यांनीही यावेळी तालुकानिहाय आढावा बैठक घेऊन कारवाईची माहिती द्यावी,’ असे सांगितले.


प्रचाराची सांगता रविवार, १९ रोजी मध्यरात्री बारा वाजता संपत आहे. मात्र, प्रचारासाठी ध्वनिक्षेपकाला केवळ रात्री दहा वाजेपर्यंतचीच परवानगी दिली आहे. त्यामुळे दहानंतर केवळ मूक प्रचारच होऊ शकतो.

Web Title: Promotions will stop today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.