जावळीत कोरोना प्रतिबंधाकरिता प्रशासनाचे योग्य नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:37 AM2021-05-24T04:37:51+5:302021-05-24T04:37:51+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी-अधिक होताना दिसत आहे. शंभरी पार केलेली बधितांची संख्या आता ...
कुडाळ : जावळी तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी-अधिक होताना दिसत आहे. शंभरी पार केलेली बधितांची संख्या आता कमी होत असून, याकरिता प्रशासनामार्फत योग्य नियोजन केले आहे. त्यामुळे कोरोनामुक्तीचा आकडा वाढत आहे. याकरिता उपविभागीय अधिकारी सोपान टोनपे, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तहसीलदार राजेंद्र पोळ, तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते, सर्व डॉक्टर व कर्मचारी तसेच शिक्षण विभाग प्रयत्न करत आहेत.
तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. या आठवड्यात ती शंभरच्या आत आल्याने समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यात अजूनही ७१९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वांनी प्रशासनाला साथ दिली तर निश्चितच तालुका कोरोनामुक्त होण्यास फारसा वेळ लागणार नाही. याकरिता प्रत्येकाने नियमांचे पालन करून कोरोनाला लवकर हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
शनिवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार, तालुक्यात दि. २० व २१ मे रोजी झालेल्या ॲन्टिजन चाचणीमध्ये ९७ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. सध्या तालुक्यात ७१९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत तसेच आजअखेर ६ हजार ३३९ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
कोरोनाबाधित व त्यांच्या कुटुंबीयांकडून गृह अलगीकरणाचे व्यवस्थित पालन होत नसल्याने संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे यापुढे लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी गावपातळीवर ग्राम विलगीकरण केंद्र तयार करून त्यांना त्याठिकाणी ठेवण्यात येईल. तसेच लक्षणे असलेल्या बाधितांना कोरोना केअर सेंटरमध्ये पाठवले जाईल, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याकरिता योग्य नियोजन केले असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.