महाबळेश्वरमधील हैद्राबादच्या निझामांची मालमत्ता सील; पोलिस बंदोबस्तात घेतला ताबा

By दीपक शिंदे | Published: December 3, 2022 08:39 PM2022-12-03T20:39:03+5:302022-12-03T20:40:04+5:30

माजी नगरसेवक कुमार शिंदे यांचे इमारतीत होते वास्तव्य

property seal of the nizams of hyderabad in mahabaleshwar | महाबळेश्वरमधील हैद्राबादच्या निझामांची मालमत्ता सील; पोलिस बंदोबस्तात घेतला ताबा

महाबळेश्वरमधील हैद्राबादच्या निझामांची मालमत्ता सील; पोलिस बंदोबस्तात घेतला ताबा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा: हैद्राबाद येथील निझामांना भाडेपट्ट्याने दिलेला १५ एकर १५ गुंठे भूखंड व त्यावर निझामांनी बांधलेला अलिशान वुडलॉन हा बंगला सील करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महाबळेश्वर तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांनी मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करून त्याचा ताबा घेतला. मुख्य बंगला व परीसरात असलेल्या सर्व इमारतींना सील ठोकण्यात आले. आजच्या बाजारभावाप्रमाणे या मिळकतीची किंमत २०० ते २५० कोटी रुपयांची आहे. सध्या महाबळेश्वरचे माजी नगरसेवक कुमार शिंदे यांच्याकडे या इमारतीचा ताबा होता. महाबळेश्वरमधील ही मिळकत एक डिसेंबर रोजी ताब्यात घेण्यासाठी आलेल्या साठ ते सत्तर लोकांच्या जमावामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. यापूर्वी देखील अनेक वेळा मिळकतीचा ताब्या घेण्यावरून दोन गटात वाद झाले आहेत. 

ही बाब लक्षात घेऊन सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी २ डिसेंबर रोजी महाबळेश्वर तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांना वुडलॉन ही मिळकत ताब्यात घेण्याचे आदेश दिले. तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक सकाळी दहा वाजता वुडलॉन बंगल्यावर पोहचले येथील मुख्य बंगल्याशेजारी असलेल्या स्टाफ क्वार्टर मध्ये गेली अनेक वर्षे माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व त्यांचे पती माजी नगरसेवक कुमार शिंदे हे राहत आहेत. त्यांना शासकीय कारवाई बाबत तहसिलदार पाटील यांनी माहिती देऊन तुमचे सर्व साहित्य बाहेर काढून बंगला सोडण्यास सांगितले. 

सकाळी दहा नंतर शिंदे कुटुंबियांनी आपले सर्व साहित्य बाहेर काढण्यास प्रारंभ केला. साधारण सायंकाळी पाच वाजेपर्यंत साहित्य बाहेर काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मुख्य बंगल्याच्या सर्व खोल्यांना तहसिलदार यांच्या समक्ष सील ठोकण्यात आले. तर सायंकाळी साडे पाच वाजता निझामांच्या स्टाफ क्वार्टरला सील ठोकण्यात आले. सर्वात शेवटी या बंगल्याचे दोन्ही गेट देखील पथकाने सील केले. दरम्यान, या बंगल्यात कोणाही खाजगी व्यक्तीला प्रवेश करण्यास मनाई असल्याचे फलक शासनाच्या वतीने लावण्यात आले आहेत.

मिळकतीचा नेमका वाद काय

ब्रिटीशांनी हा भूखंड भाडेपट्ट्याने पारशी वकील यांना दिला होता. १९५२ साली हिज हायनेस नबाब मीरसाब उस्मान अल्लीखान बहादुर नबाब ऑफ हैद्राबाद यांच्या नावे तो करण्यात आला. नबाब यांचेकडे आयकराची मोठी थकबाकी होती. ५९ लाख ४७ हजार ७९७ रूपयांचा आयकर वसुलीसाठी टॅक्स रिकव्हरी ऑफिसर कोल्हापूर यांच्याकडील पत्रांनुसार थकबाकीची नोंद मिळकत कार्डावर करण्यात आली व जो पर्यंतही वसुली होत नाही तोपर्यंत ही मिळकत विक्री करणे, गहाण ठेवणे व कोणत्याही प्रकारचा व्यवहार करणे याबाबत मनाई करण्यात आली. हैद्राबाद येथील नबाब यांचे वारस म्हणून नबाब मीर बरकत अल्लीखान बहादुर यांचे नाव लावण्यात आले. २००३ साली पुन्हा ही मिळकत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मिळकतीवरील सर्व पट्टेदार यांची नावे वगळून ही मिळकत शासनजमा केली. २००५ साली पुन्हा जिल्हाधिकारी यांनी दिलेला आदेश मागे घेऊन पूर्वीप्रमाणे परीस्थिती कायम करणेत येत आहे असे आदेश दिले. २०१६ साली या मिळकतीचे हस्तांतरण झाले व मिळकतीवर डायरेक्टर हर्बल हॉटेल प्रा. लि तर्फे दिलीप ठक्कर यांचे नाव लावण्यात आले. तेव्हापासून ठक्कर आणि नवाब यांच्च्या वादात ही मिळकत अडकली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: property seal of the nizams of hyderabad in mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.