जिल्ह्यात बाधित रुग्णांचे प्रमाण ४० टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:05 AM2021-05-05T05:05:13+5:302021-05-05T05:05:13+5:30
सातारा : जिल्ह्यात मंगळवारी २ हजार ५९ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, ३२ बाधितांचा मृत्यु झाला. दरम्यान, प्रशासनाने नियम ...
सातारा : जिल्ह्यात मंगळवारी २ हजार ५९ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, ३२ बाधितांचा मृत्यु झाला. दरम्यान, प्रशासनाने नियम न पाळणाऱ्या लोकांवर कठोर कारवाया सुरू केल्या आहेत. गेल्या २४ तासात ५ हजार ६६ कोरोनाबाधित रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये २०५९ जण बाधित असून हे प्रमाण ४०.६४ टक्के आहे.
जिल्ह्यामध्ये सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कोरोना बाधितांची संख्या घटली; मात्र बाधितांचे मृत्यू रोखण्यात प्रशासनाला अजून तरी यश आलेले नाही. सातारा तालुक्यात ४१४ तर कराड तालुक्यात ३१६ रुग्ण मंगळवारी आढळले. सातारा तालुक्यात अकरा जणांचा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झाला. सातारा आणि कराड हे दोन्ही तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट झालेले आहेत.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या मंगळवारी संध्याकाळपर्यंत १ हजार ८३२ नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, शासनाने घालून दिलेले निर्बंध झुगारून लोक रस्त्यावर फिरत असल्याने मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. आता जिल्ह्यात लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्वच शहरांतील रस्ते तसेच बाजारपेठांमध्ये मंगळवारी गर्दीचे प्रमाण कमी दिसले. किराणा मालाची दुकाने, दूध डेअरी, भाजी विक्री यावर बंदी असताना देखील मंगळवारी सकाळच्या वेळेत अनेक जण वाहने घेऊन रस्त्यावर आले; मात्र पोलिसांनी सकाळपासूनच कठोर कारवाई सुरू केली. नियम मोडणाऱ्या लोकांची वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारवाईची माहिती पसरल्यानंतर रस्त्यावर गर्दी कमी झाली.
कुसुंबीत लग्न समारंभ घेणाऱ्याला ५० हजारांचा दंड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गर्दीचे कार्यक्रम, लग्न समारंभाच्या संख्येवर जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून निर्बंध घातले असताना जावळी तालुक्यातील कुसुंबी या गावात लग्नाला मर्यादेपेक्षा जास्त लोक असल्यामुळे आज त्यांच्यावर ५० हजारांची दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात आली. लग्न समारंभामध्ये १०० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती होती.