आरोपींची वारी... थेट कळंबा जेलच्या दारी!
By Admin | Published: August 3, 2015 09:38 PM2015-08-03T21:38:45+5:302015-08-03T21:38:45+5:30
कऱ्हाडचे उपकारागृह बंद : पोलीस कोठडीतील आरोपी ‘लॉकअप’ला; न्यायालयीन कोठडी सुनावताच कोल्हापूरला रवानगी
संजय पाटील -कऱ्हाड -प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी येथील तहसील कार्यालयासह उपकारागृहाची ब्रिटिशकालीन इमारत पाडण्यात आली आहे. सध्या इतर शासकीय कार्यालये व तहसील कार्यालयाचे कामकाज जिल्हा सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीमध्ये सुरू आहे. मात्र, उपकारागृहासाठी जागाच उपलब्ध नसल्याने न्यायालयीन कोठडीतील आरोपींना तत्काळ कोल्हापूरच्या ‘कळंबा जेल’ला हलविण्यात येत आहे. तसेच पोलीस कोठडीतील आरोपींना ठेवण्यासाठी त्या-त्या पोलीस ठाण्यात कस्टडीची सोय नसल्याने त्यांना इतर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात येत आहे. ही कसरत सध्या पोलिसांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. कऱ्हाड व पाटण उपविभागातील आरोपींना ठेवण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात उपकारागृह होते. त्याचबरोबर तालुका पोलीस ठाणे, पुरवठा विभाग, सेतू, निबंधक आदी शासकीय कार्यालयेही याच परिसरात होती. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कालावधीत कऱ्हाडसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाल्याने त्या इमारतीसाठी तहसील कार्यालय परिसरातील जागा निश्चित करण्यात आली. परिणामी, त्या जागेतील तहसील कार्यालयासह इतर सर्व शासकीय कार्यालये बाजार समितीनजीकच्या सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीत स्थलांतरित केली. तसेच जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीत हलविण्यात आलेल्या सर्व विभागांचे कामेही सुरळीत सुरू आहेत. पण, इतर कार्यालये स्थलांतरित झाली असली तरी उपकारागृहासाठी जागाच उपलब्ध नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात उपकारागृहच बंद करण्यात आले आहे. तसेच येथे जेलर म्हणून नियुक्ती असणाऱ्या अधिकाऱ्याचीही पुण्याला बदली करण्यात आली आहे. नवीन प्रशासकीय इमारतीत उपकारागृह प्रस्तावित आहे; पण इमारत पूर्ण होईपर्यंत कऱ्हाड व पाटण उपविभागातील पोलीस ठाण्यांचे आरोपी तेथीलच लॉकअपमध्ये ठेवावे लागत आहेत. कऱ्हाड उपविभागामध्ये कऱ्हाड शहर, उंब्रज व तळबीड पोलीस ठाण्यात तसेच पाटण उपविभागामध्ये पाटण, ढेबेवाडी व कोयनानगर पोलीस ठाण्यात ‘लॉकअप’ची सोय आहे. जोपर्यंत आरोपी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस कोठडीत आहे, तोपर्यंत त्याला संबंधित पोलीस ठाण्याच्या ‘लॉकअप’मध्ये ठेवण्यात येते. मात्र, आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावताच त्याला सातारच्या जिल्हा कारागृहात किंवा कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये पाठवावे लागत आहे. यापूर्वी पोलीस कोठडीसह न्यायालयीन कोठडीतील आरोपीही काही दिवस कऱ्हाडच्या उपकारागृहात ठेवले जायचे. जास्त दिवस जामीन झाला नाही, तरच त्या आरोपीला जिल्हा किंवा कळंबा कारागृहात पाठविले जायचे. सध्या मात्र न्यायालयीन कोठडी सुनावताच आरोपीला जिल्हा अथवा कळंबा कारागृहाची हवा खावी लागत आहे.
कोयनानगरचे आरोपी पाटणला
पाटण तालुक्यातील कोयनानगर पोलीस ठाण्यात लॉकअप असूनही ते वापरण्यासाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे लॉकअपचे नूतनीकरण करावे लागणार असून, कोयनानगर पोलीस ठाण्याच्या आरोपींना पाटण पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवले जाणार आहे.
पोलीस अधीक्षकांकडून लॉकअपची तपासणी
काही दिवसांपूर्वी आरोपी लॉकअपमधून पळून गेल्याच्या घटना राज्यात घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार उपअधीक्षकांना त्यांच्या उपविभागातील पोलीस ठाण्यांमध्ये असणाऱ्या लॉकअपची तपासणी करण्यास सांगण्यास आले होते. उपअधीक्षकांनी तशी तपासणी करून त्याचा अहवाल पोलीस अधीक्षकांना पाठविला. या अहवालानुसार काही पोलीस ठाण्यांचे लॉकअप सुरक्षित नसल्याने त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये उपकारागृह होणार आहे. त्याची जागाही निश्चित आहे. मात्र, बरॅकची संख्या कमी होती. त्यामध्ये पूर्वीइतके आरोपी ठेवता येणार नव्हते. त्यामुळे बरॅकची संख्या वाढविण्यासंदर्भात संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. बरॅक वाढवून मिळतील, अशी अपेक्षा आहे.
- बी. एम. गायकवाड,
निवासी नायब तहसीलदार
... असे होते उपकारागृह
कऱ्हाडला तहसील कार्यालयानजीकच्या इमारतीत १९७० मध्ये उपकारागृह सुरू करण्यात आले. कारागृहाची इमारत ब्रिटिशकालीन व कौलारू होती.
कऱ्हाड शहर, कऱ्हाड तालुका, उंब्रज, तळबीड या पोलीस ठाण्यांतील आरोपींना या कारागृहात ठेवले जायचे. उपकारागृहात एकूण ११ खोल्या होत्या; मात्र यामधील फक्त पाच खोल्यांमध्येच आरोपी ठेवण्यात येत होते.
दोन नंबरची खोली लेडीज बरॅक, तीन नंबरच्या खोलीत कारागृहाचे कार्यालय, चौथ्या खोलीत शस्त्र, पाच नंबरची खोली ट्रेझरी, सहा व अकरा क्रमांकांच्या खोलीत निवडणूक पेट्या व साहित्य ठेवण्यात येत होते.
सात, आठ, नऊ व दहा या चार खोल्यांमध्येच आरोपी ठेवण्यात येत होते. लेडीज बरॅक व इतर चार या एकूण पाचही खोल्यांमध्ये न्यायालयीन व पोलीस कोठडी, अशी विभागणी करण्यात आलेली नव्हती.
उंब्रजचे आरोपी तळबीडला
उंब्रज पोलीस ठाण्यात लॉकअप आहे. मात्र, सध्या या लॉकअपच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. बांधकाम सुरू असल्याने येथील लॉकअप बंद ठेवण्यात आले असून, तेथील पोलीस कोठडीतील आरोपींना तळबीड पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात येत आहे.
कऱ्हाड तालुका ठाण्यात लॉकअप नाही !
कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याच्या अखत्यारित कऱ्हाड उत्तरेतील वाघेरी तर दक्षिणेतील येणपे गावापर्यंतचा भाग आहे. कार्यक्षेत्र जास्त असल्याने येथे घडणारे गुन्हे व आरोपींची संख्याही जास्त असते. मात्र, सध्या तालुका पोलीस ठाणे स्थलांतरित करण्यात आले असून, त्याठिकाणी लॉकअपची सोय नाही. परिणामी, आरोपींना तळबीड पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवावे लागत
आहे.