Kaas plateau: कास पठार घेणार मोकळा श्वास!, संरक्षक जाळ्या काढण्यास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 03:28 PM2022-12-01T15:28:38+5:302022-12-01T15:42:38+5:30
वन्यप्राण्यांपासून फुलांचे संरक्षण व्हावे यासाठी जाळ्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून फुलणाऱ्या फुलांचे प्रमाण कमी होताना दिसत होते
सागर चव्हाण
पेट्री : शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठारावरील तारेची संरक्षक जाळी काढण्याचे काम सुरू असल्याने कास पठार आता मोकळा श्वास घेणार आहे. याचा फायदा फुलांच्या हंगामात दुर्मीळ फुलांच्या वाढीसाठी होणार असल्याचे बोलले जात आहे.
जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठारावर दरवर्षी फुलांच्या हंगामात विविधरंगी तसेच दुर्मीळ फुले फुलतात. दरम्यान हा फुलोत्सव पाहण्यासाठी जिल्हा, राज्य, देश-विदेशातून लाखो पर्यटक कास पठाराला भेट देत असतात. गेल्या काही वर्षांपासून फुलणाऱ्या फुलांचे प्रमाण कमी होतानाचे चित्र दिसत असल्याने वन्यप्राणी तसेच गाई, गुरे मुक्तपणे संचार करून शेणखत उपलब्ध झाल्यास तसेच या प्राण्यांचा वावर मुक्तपणे सर्वत्र पठारावर असल्यास फुले फुलण्याच्या प्रमाणात वाढ होईल. संरक्षक जाळी हटविली जावी, यासाठी अनेकांनी आपले मत व्यक्त केले होते.
तसेच जाळी बसविल्यापासूनच ‘लोकमत’नेही या संरक्षक जाळ्या बसविण्याला प्रखर विरोध केला होता. दरम्यान तेव्हाच संरक्षक जाळ्या हटविल्या असत्या तर आज फुलांचे अत्यल्प प्रमाण पाहायला मिळाले नसते असे अनेक पर्यटकांनी मत व्यक्त केले. पठारावरील फुलांचे प्रमाण कमी होण्यामागे अति पाऊस हे जरी कारण पुढे येत असले तरी ते निसर्गतः आहे. निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही; परंतु प्राण्यांचा मुक्त संचार पठारावर झाल्यास फुले फुलण्याचे प्रमाण निश्चित वाढू शकेल. ही उपाययोजना आपल्या हातात असून, याचा निश्चितच फायदा येथून पुढे फुलत्या फुलोत्सवावरून पाहावयास मिळेल, असे मत व्यक्त केले जात आहे. तसेच फुलांच्या हंगामात वर्दळ वाढून फुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी तात्पुरत्या स्वरुपात संरक्षक जाळीची सोय केली जाणार असल्याचे सांगितले.
कुमुदिनी परिसरात फुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामानाने इतरत्र रस्त्यालगत फुलांचे प्रमाण कमी असल्याने गुरे सर्वत्र चरणे आवश्यक आहे. परिसरात गुरांचे प्रमाण वाढून गुरे चारण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. याचा फायदा फुलांच्या वाढीवर नक्कीच होईल. -सचिन पवार, सातारा, पर्यटक
कास पठार समिती व वनविभागामार्फत संरक्षक जाळी लावण्यात आली होती. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या जाळीचा दुष्परिणाम फुलांच्या हंगामावर होत असल्याने आजपासून जाळी काढण्याचे काम सुरू आहे. आता वन्यप्राण्यांसाठी पठार परिसर मोकळा होत असून, पुढील फुलांचा हंगाम पूर्वीप्रमाणे येईल, अशी अपेक्षा आहे. हंगाम काळात फुलांच्या संरक्षणासाठी तात्पुरती जाळी बसवली जाणार आहे. - रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी