कमंडलू नदीच्या बाजूची संरक्षक भिंत ढासळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:25 AM2021-06-28T04:25:38+5:302021-06-28T04:25:38+5:30
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील कमंडलू नदीच्या बाजूने नुकतीच बांधण्यात आलेली संरक्षक भिंत ढासळली आहे. निकृष्ट दर्जाचे काम ...
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील कमंडलू नदीच्या बाजूने नुकतीच बांधण्यात आलेली संरक्षक भिंत ढासळली आहे. निकृष्ट दर्जाचे काम केल्यानेच भिंत ढासळल्याचा आरोप करत रहिमतपूर येथील नागरिकांचा ठेकेदाराच्या नावाने शिमगा सुरू आहे.
कमंडलू नदीच्या बाजूने वसलेल्या नागरिकांनी नदीच्या पुराच्या पाण्यापासून घराचे संरक्षण व्हावे, यासाठी नदीकडेने सिमेंट काँक्रिटची संरक्षक भिंत उभारावी, अशी नगरपालिकेकडे सातत्याने मागणी केली होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्यासह पालिका पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून कमंडलू नदीच्या सुशोभिकरणासाठी निधी मंजूर करून आणून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. घाणीची बजबजपुरी असणाऱ्या कमंडलू नदीपात्राचा सुशोभिकरणामुळे कायापालट झाला. मात्र, नदीपात्राकडेला संरक्षक भिंतीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने जाळी टाकून दगडात रचलेली सुमारे तीस फूट लांबीची संरक्षक भिंत महिनाभरातच एका पावसात नदीपात्रात ढासळली आहे. ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे चांगल्या कामाला बट्टा लागला आहे. नागरिकांच्या मागणीनुसार, पाण्याचा प्रवाह ज्या बाजूला येऊन धडकतो, त्या पाण्याच्या प्रवाहाचा मुकाबला करण्यासाठी त्याठिकाणी सिमेंट काँक्रिटची भिंत बांधणे गरजेचे होते. परंतु, पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधी बाजूला काँक्रिटची भिंत बांधून उलटेसुलटे काम करण्यात आले आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
(चौकट )
ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
कमंडलू नदीपात्राकडेला बांधण्यात आलेली संरक्षक भिंत एक महिनाभरही टिकली नसल्याने ठेकेदाराच्या कामाचा दर्जा स्पष्ट होतो. या कामाचे थर्डपार्टी ऑडिट होईपर्यंत बिल काढू नका, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाका, अशी मागणी रहिमतपूर नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते नीलेश माने यांनी केली आहे.
फोटो : रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील कमंडलू नदीपात्राकडेची संरक्षक भिंत एका पावसातच कोसळली आहे. (छाया : जयदीप जाधव)