सायकल चालवून पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:48 AM2021-07-07T04:48:56+5:302021-07-07T04:48:56+5:30
सातारा : केंद्र व राज्य सरकार पेट्रोल, डिझेल आणि गॅस दर वाढीकडे दुर्लक्ष करत असल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला ...
सातारा : केंद्र व राज्य सरकार पेट्रोल, डिझेल आणि गॅस दर वाढीकडे दुर्लक्ष करत असल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. याच्या निषेधार्थ रिपाइं(ए) च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सायकल चालवून निषेध आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल, डिझेल शंभरी पार आणि गॅस २५ रुपयांनी महागला आहे. महागाई करत दोन्ही सरकार आपली पोळी भाजून घेत आहेत. कोरोनाने अक्षरशः अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असतानाच महागाईचा आगडोंब होत आहे. जिल्हा प्रशासन वारंवार लॉकडाऊन करत असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच बुलडाणा येथील विधानसभेचे आ. संजय गायकवाड यांनी खामगाव दौऱ्यावर असताना दलित समाजाबाबत अपशब्द केला आहे. त्याचा निषेध करत त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष दादा ओव्हाळ, मदन खंकाळ, किरण बगाडे, रमेश नाटेकर, बाबा ओव्हाळ, किरण ओव्हाळ, संगीता शिंदे, दामिनी निंबाळकर, दीपक नलावडे, शेखर अडागळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाइंच्या वतीने सायकल चालवून आंदोलन करण्यात आले.