कोपर्डीच्या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध

By admin | Published: July 21, 2016 01:18 AM2016-07-21T01:18:22+5:302016-07-21T01:21:12+5:30

आरोपींना फाशी देण्याची मागणी : कऱ्हाडात विविध संघटनांचे निवेदन; राजकीय पक्षही आक्रमक

Protest in all the levels of the event of the Coppardi | कोपर्डीच्या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध

कोपर्डीच्या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध

Next

कऱ्हाड : कोपर्डी, जि. अहमदनगर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद सर्वत्र उमटत असताना कऱ्हाडातही अनेक संघटनांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांना तातडीने अटक करून त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा व त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. सामाजिक संघटनांसह विविध राजकीय पक्षांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेत प्रशासनाला निवेदने सादर केली आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. ठिकठिकाणी मोर्चा, आंदोलने, रास्ता रोको केला जात आहे. तसेच विधानसभेच्या अधिवेशनातही या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीपर्यंत पोहोचविल्याशिवाय राज्य सरकार स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. सर्वत्र या घटनेचा निषेध व्यक्त होत असतानाच कऱ्हाडातही अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. बुधवारी याप्रकरणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने तहसीलदार राजेंद्र शेळके यांना निवेदन देण्यात आले. कोपर्डी येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेविरोधात समाजातून तीव्र संताप व्यक्त होत असून, या घटनेतील फरार आरोपींना तातडीने अटक करावी. समाजामध्ये असे अनेक गुन्हे घडत आहेत. गुन्हेगारांना निर्भया हत्याकांडाप्रमाणे फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी शिक्षा झाल्यास गुन्हेगारांवर दहशत निर्माण होईल. या प्रकरणाचा जलद गतीने तपास व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्षा प्रभावती माळी, जिल्हा सरचिटणीस मीना बोरगावे, महिला बालकल्याण विभागाच्या माजी सभापती नीलम पार्लेकर, बनवडीच्या सरपंच उषा करांडे, शोभा माळी, अमृता भंडारे, राजश्री भिंगारदेवे, उषा धुलुगडे, लक्ष्मी घाडगे, सुजाता घाडगे, शालन माळी, संगीता खापे, सावित्री खापे, सुवर्णा माळी, सुनीता थोरात, मंगल करांडे आदी उपस्थित होत्या.
प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेनेही निषेध केला. संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा सूर्यवंशी यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. या घटनेबाबत राज्य सरकारने तातडीने ठोस पावले उचलून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)


मुली व महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कठोर धोरण अवलंबणे गरजेचे आहे. त्यासाठी कायद्यात काही सुधारणा अपेक्षित आहेत. एखादी घटना घडल्यानंतर त्याबाबतची चर्चा होते. मात्र, पुढे काहीच होत नाही. जोपर्यंत अशा प्रकरणातील गुन्हेगारांवर कडक जरब बसत नाही, तोपर्यंत अशा घटनांना आळा बसणार नाही.
- डॉ. सविता मोहिते


कोपर्डी येथील घटना लाजिरवाणी आहे. अशा घटनांमुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना नसेल तर ही बाब समाजासाठी अत्यंत घातक आहे. मुली व महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा योग्य ठरेल. या प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
- अर्चना पाटील, शहराध्यक्षा, काँग्रेस


अशा घटनांची निंदा करेल तेवढी थोडी आहे. मुलींवर अत्याचार करणाऱ्या प्रवृत्ती वाढत असताना अशा घटना रोखण्यासाठी कडक धोरण अवलंबले जात नाही, ही बाब लाजिरवाणी आहे. शासनाने या घटनेचा धडा घेऊन यापुढे अशा घटना होणार नाहीत, यासाठी पावले उचलावीत. तसेच आत्तापर्यंतच्या अशा घटनांतील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.
- संगीता देसाई, नगराध्यक्षा, कऱ्हाड

Web Title: Protest in all the levels of the event of the Coppardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.