Satara: अन्यायकारकपणे टोलवसुली बंद करा, उंब्रजसह परिसरातील नागरिकांचे तासवडे टोलनाक्यावर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 01:56 PM2024-07-08T13:56:13+5:302024-07-08T13:56:34+5:30

..तर टोल नाही टोले देऊ !

Protest by citizens of the area including Umbraj over toll collection at Taswade toll plaza on Pune-Bangalore National Highway | Satara: अन्यायकारकपणे टोलवसुली बंद करा, उंब्रजसह परिसरातील नागरिकांचे तासवडे टोलनाक्यावर आंदोलन

Satara: अन्यायकारकपणे टोलवसुली बंद करा, उंब्रजसह परिसरातील नागरिकांचे तासवडे टोलनाक्यावर आंदोलन

उंब्रज : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाक्यावर स्थानिक वाहनधारकांकडून अन्यायकारकपणे टोलवसुली केली जात आहे. याच्या विरोधात उंब्रजसह परिसरातील नागरिकांनी रविवारी शेकडो चारचाकी प्रवासी, मालवाहतूक व खासगी वाहनांसह टोलनाक्याची सातारा ते कऱ्हाडला जाणारी वाहतूक रोखून आंदोलन केले.

उंब्रजसह परिसरातील शेकडो नागरिकांनी चारचाकी प्रवासी, मालवाहतूक व खासगी वाहनांसह रविवारी सकाळी अकराच्या सुमारास तासवडे टोल नाक्याची सातारा-कऱ्हाड वाहतूक रोखली. टोल प्रशासनाला स्थानिकांना टोल नाक्याच्या स्थापनेपासून सुरू असणारी टोलमाफी कायम ठेवावी या मागणीचे निवेदन दिले. टोल आजपर्यंत दिला नाही, पुढेही टोल देणार अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली. टोल प्रशासनाच्या वतीने व्यवस्थापक थोरात यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी कऱ्हाड पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर उपस्थित होते. परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

तासवडे टोल नाक्यावर मागील आठ ते दहा दिवसांपासून स्थानिक नागरिकांच्या फास्ट टॅगमधून वाहनाने टोल परिससरात ये-जा केल्यानंतर आपोआप पैसे कापले जात होते. यामध्ये फास्ट टॅग घरी असला तरी काहींना मेसेज आल्याने स्थानिकांत नाहक भुर्दंड बसू लागल्याने रोष निर्माण होऊ लागला होता. याबाबत ३० जून रोजी उद्धवसेनेचे कऱ्हाड उत्तर तालुका प्रमुख संजय भोसले यांनी निवेदन दिले होते. तरीही टोल प्रशासनाने स्थानिकांची टोल वसुली सुरूच ठेवल्याने वाहनांसह मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. यानुसार रविवारी सकाळी अकरा वाजता परिसरातील आंदोलक वाहनांसह एकत्र जमा होऊन तासवडे टोलनाका परिसरात मार्गस्थ झाले.

यावेळी उंब्रजचे सरपंच योगराज जाधव, मार्केट कमिटी संचालक सोमनाथ जाधव, उंब्रज ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव, संजय भोसले तसेच ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. ‘न्हाय’च्या कोल्हापूर कार्यालयास माहिती देऊन शासनाने मानवरहित टोल ही संकल्पना अवलंबली असल्याने नवीन पद्धतीने केली जाणारी टोल वसुली यंत्रणा अवलंबल्याने स्थानिकांचा टोल कापला जात आहे. वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून समन्वय काढून अडचणीतून मार्ग काढणार आहे, अशी माहिती थोरात यांनी दिली.

..तर टोल नाही टोले देऊ !

आजी-माजी स्थानिक लोकप्रतिनिधी शांत आहेत. नागरिकांच्या अडचणी त्यांना समजत नाहीत का? टोल नाक्यावर ये-जा करीत असताना स्थानिक नागरिकांचे वाहन सोडले जाते. गाडी टोल पास करून पुढे आल्यानंतर टोल कटिंग मेसेज येतो. हा वाहनधारकांच्या खिशावर दरोडा आहे. हे त्वरित न थांबल्यास टोल नाहीच पण टोले दिले जातील, असा इशारा उंब्रजचे सरपंच योगराज जाधव यांनी दिला.

टोलनाका स्थापनेपासून टोल दिला नाही व यापुढेही देणार नाही. स्थानिकांना दैनंदिन गोष्टीसाठी टोलनाक्यावरून ये-जा करावी लागते. वाहनधारकांच्या नकळत त्यांचे टोल कट होत आहेत, हा अन्याय स्थानिक कदापि सहन करणार नाहीत. - सोमनाथ जाधव, संचालक, शेती उत्पन्न बाजार समिती कऱ्हाड.

Web Title: Protest by citizens of the area including Umbraj over toll collection at Taswade toll plaza on Pune-Bangalore National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.